फ्लॅटसाठी ३ लाख, कारसाठी २ लाख; पैशांच्या मागण्यांनी घेतला विवाहितेचा बळी? पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा
चारचाकी, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी छळ; २५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
पुणे (Dowry Harassment Case) : शहरातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी पैशांची मागणी, शारीरिक व मानसिक छळ, गर्भलिंग तपासणीसाठी दबाव आणि गर्भपाताच्या आरोपांमुळे त्रस्त झालेल्या २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेचे पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मृत विवाहितेचे नाव तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५) असे आहे. तेजस्विनीचा विवाह २०२० मध्ये गोरख सोनवणे याच्याशी झाला होता. या दाम्पत्याला अडीच वर्षांची मुलगी आहे. मात्र, मुलगी जन्माला आल्यानंतर तेजस्विनीच्या आयुष्यातील अडचणी वाढू लागल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
तक्रारीनुसार, पती गोरख सोनवणे याने कार खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने तेजस्विनीला वारंवार मारहाण करण्यात येत होती. दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळीही तिच्या वडिलांनाच एक लाख रुपये खर्च करून रुग्णालयाचे बिल भरावे लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे जून २०२४ मध्ये तेजस्विनी दुसऱ्यांदा गरोदर असताना तिच्यावर कथितरित्या गर्भलिंग तपासणीसाठी दबाव टाकण्यात आला. "पहिले मुलगी झाली आहे, आता मुलगा की मुलगी हे तपासा आणि मुलगा असेल तरच नांदवायला आणा," असे पतीकडून सांगण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या मानसिक त्रासामुळे तेजस्विनीचा गर्भपात झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतरही छळ थांबला नाही. एप्रिल २०२६ मध्ये फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. तसेच नुकत्याच झालेल्या अधिक मासातील जेवणाच्या निमंत्रणावेळीही "सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ," अशी अट घालण्यात आली होती. या कारणावरूनही तेजस्विनीला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चारचाकी वाहन, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सुरू असलेला छळ दिवसेंदिवस वाढत गेला. सततचा मानसिक ताण, अपमान आणि कौटुंबिक अत्याचार यामुळे तेजस्विनी पूर्णपणे खचली होती. संसार टिकवण्यासाठी ती सर्व काही सहन करत होती. मात्र, अखेर २ जून २०२६ रोजी रात्री तिने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मृत विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदननगर पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, विवाहितेचा छळ करणे आणि हुंड्यासाठी त्रास देणे यासंदर्भातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आपल्या मुलीला कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सातत्याने छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर तेजस्विनीच्या कुटुंबीयांनी आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महिलांवरील अत्याचार, हुंड्यासाठी होणारा छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या या प्रकरणाचा चंदननगर पोलीस सखोल तपास करत आहेत.