पुणे विमानतळावर मोठा अनर्थ टळला! धावपट्टीवर कुत्रा आल्याने जयपूरचे विमान ऐन उड्डाणावेळी थांबवले
ATC कडून मिळालेल्या इशाऱ्यानंतर वैमानिकांचा 'रिजेक्टेड टेकऑफ'; सुमारे तासभर उशिराने विमानाचे सुरक्षित उड्डाण
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी दुपारी गंभीर सुरक्षा धोक्याची घटना घडली. जयपूरकडे रवाना होणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान उड्डाणासाठी धावपट्टीवर वेग घेत असताना अचानक एक भटका कुत्रा समोर आल्याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून (ATC) मिळाली. त्यानंतर वैमानिकांनी तत्काळ 'रिजेक्टेड टेकऑफ'ची प्रक्रिया राबवत विमान सुरक्षितपणे थांबवले. या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
एअर इंडिया एक्स्प्रेसचे IX 2458 हे विमान दुपारी सुमारे ३.१५ वाजता पुण्याहून जयपूरसाठी उड्डाण करणार होते. सर्व प्रवासी विमानात बसल्यानंतर उड्डाणाची परवानगी देण्यात आली होती. विमानाने धावपट्टीवर वेग पकडल्यानंतर ATC ने धावपट्टीवर कुत्रा धावत असल्याचा इशारा वैमानिकांना दिला. त्यानंतर कोणताही धोका पत्करू न देता विमान तातडीने थांबवण्यात आले.
अचानक लावण्यात आलेल्या ब्रेकमुळे विमानातील काही प्रवाशांमध्ये काही काळ भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. विमान पुन्हा टर्मिनलकडे नेल्यानंतर वैमानिकांनी धावपट्टीवर कुत्रा आल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण स्थगित करण्यात आल्याची माहिती प्रवाशांना दिली. त्यानंतर आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर हेच विमान सुमारे ४.२७ वाजता जयपूरच्या दिशेने रवाना झाले.
पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर भटके कुत्रे येण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये धावपट्टीवर कुत्रा आढळल्याने एका विमानाचे लँडिंग पुढे ढकलावे लागले होते आणि विमानाला काही काळ हवेत घिरट्या घालाव्या लागल्या होत्या. तसेच इतर वेळीही कुत्रे आणि विविध प्राणी धावपट्टी परिसरात आढळल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
या घटनांनंतर हवाई दल, महापालिका आणि विमानतळ प्रशासनाने धावपट्टी परिसरातील कुंपण दुरुस्त करणे, सुरक्षा गस्त वाढवणे, भटके प्राणी पकडण्यासाठी विशेष पथके तैनात करणे आणि प्रवेशाचे मार्ग बंद करण्यासारख्या उपाययोजना केल्याचा दावा केला होता. मात्र, ताज्या प्रकारामुळे या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यापूर्वीही पुणे विमानतळावर दिल्लीहून येणाऱ्या एका विमानाच्या इंजिनाला पक्षी धडकल्याची घटना घडली होती. तसेच पक्ष्यांच्या वाढत्या वावरामुळे काही वेळा उड्डाणांवर परिणाम झाला होता. काही दिवसांपूर्वी धावपट्टी परिसरात बिबट्या दिसल्याची घटनाही समोर आली होती. त्यामुळे विमानतळाच्या सुरक्षेबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घटनेबाबत विचारणा केली असता विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी धावपट्टी हवाई दलाच्या नियंत्रणाखाली असल्याने संबंधित माहिती त्यांच्याकडून घ्यावी, असे सांगितले. संरक्षण विभाग आणि संबंधित विमान कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडूनही या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित अशा गंभीर घटनांबाबत समन्वय आणि माहिती व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.