अजमेरहून परतणाऱ्या नाशिकच्या भाविकांच्या कारचा धुळेत भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पाच जण गंभीर
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ इनोव्हा दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली; कारचा चक्काचूर
धुळे : अजमेर येथे देवदर्शन करून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या कुटुंबावर धुळे जिल्ह्यात काळाने घाला घातला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात इनोव्हा कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमधील एक कुटुंब इनोव्हा कारने अजमेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीचा प्रवास सुरू असताना शिरपूर फाट्याजवळ भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित होत महामार्गावरील दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत घुसली.
Dhule, Maharashtra: Two devotees from Nashik were killed and five others seriously injured after their speeding Innova, returning from Ajmer, crossed the divider and collided head-on with a truck near Shirpur Phata in Dhule. Police launched rescue operations, and the injured were… pic.twitter.com/RYCOO9bcDs
— IANS (@ians_india) July 18, 2026यानंतर समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकला इनोव्हा कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवले. सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
या भीषण अपघातामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.
देवदर्शन करून आनंदाने घरी परतणाऱ्या नाशिकच्या कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.