दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नेरमध्ये लोकशाही बचाव मोर्चा
विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात दोषींवर कठोर कारवाईची मागणी
नेर (Anti-Lathi-Charge Protest March) : दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी नेर शहरात सर्वपक्षीय आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य 'लोकशाही बचाव मोर्चा' काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात विद्यार्थी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. मोर्चानंतर झालेल्या सभेत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर मोर्चा मारवाडी चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी राहुल ठाकरे, बाबू पाटील जैत, एस. यू. धांदे, नितीन माकोडे, मोहन भोयर, बापूराव रंगारी, रवीपाल गंधे, गणेश आप्पा झाडे, नितेश कठाडे, रवी काळे, विनायक भोयर, अशोक फुलझेले, वैभव बगमारे, दिलीप माहुरे, जफर खान, सत्यविजय गुल्हाने, जगदीश सव्वालाखे, गोपाल चव्हाण, भाऊराव गायकवाड, अर्चना माहुरे, रत्ना मिसळे, सुनंदा भोयर, प्रियंका बिडकर, शुभम राऊत यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्वांनी एकजूट राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.