Patur city Bandh: शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणा

दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ उद्या २३ जुलै रोजी ‘पातुर शहर बंद’चे आवाहन

Patur city Bandh

वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उबाठा) आणि मित्र पक्षांचा पातुर बंदला जाहीर पाठिंबा

पातूर (Patur city Bandh) : दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर २० जुलै रोजी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमार व हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या, गुरुवार दि. २३ जुलै २०२६ रोजी पातुर शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा लोकशाहीवर झालेला थेट आघात आहे, असा आरोप पक्ष पदाधिकाऱ्यांनी केला आहे. श्रद्धेय अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये पुकारण्यात आलेल्या या महाराष्ट्र बंद आंदोलनाला पातुर शहरातही पूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला शिवसेना (उबाठा), छावा संघटना, लहुसेना, युवा समिती, वकील संघटना, छत्रपती फुले शाहू आंबेडकर संघटना, महाराष्ट्र शेतकरी संघटना यांसह अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. व्यापारी व नागरिकांना सहकार्याचे आवाहन: दिल्लीतील घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी २३ जुलै रोजी पातुर शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठान, दुकाने, बाजारपेठ, शाळा, कॉलेज, ट्युशन क्लासेस तसेच ऑटो रिक्षा व वाहतूक व्यवस्था कडकडीत बंद ठेवून या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उबाठा) गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे केले आहे.