दिल्लीतील लाठीमाराच्या निषेधार्थ पातुर शहरात कडकडीत बंद; व्यापार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उबाठा) व विविध संघटनांच्या आवाहनाला यश जुने स्टँड, संभाजी चौकातील बाजारपेठ पूर्णपणे ठप्प
पातूर (Patur Shut Down) : दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ आज गुरुवारी वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘पातुर शहर बंद’ला व्यापाऱ्यांचा व नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ (Patur Shut Down) आज पातुर शहरातील मुख्य बाजारपेठ, जुने स्टँड परिसर, छत्रपती संभाजी महाराज चौक, टी.के.व्ही. (TKV) चौक परिसरातील सर्व दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठान व बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली प्रतिष्ठान बंद ठेवून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि विविध स्थानिक संघटनांच्या पाठिंब्याने आयोजित या बंद आंदोलनात पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"विद्यार्थ्यांवरील हल्ला हा लोकशाहीवर झालेला थेट आघात असून, या अन्यायाविरोधात संपूर्ण पातुर शहर एकमुखाने उभे राहिले आहे," अशी प्रतिक्रिया या प्रसंगी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केली. दिवसभरात पातुर शहरातील महत्त्वाच्या सर्वच भागांत शुकशुकाट पाहायला मिळाला असून, कडकडीत बंद पाळून पातुरकरांनी दिल्लीतील लाठीमार घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.