शेतकऱ्यांना पीकविमा न देणाऱ्या कुठल्याही विमा कंपन

शेतकऱ्यांना पीकविमा न देणाऱ्या विमा कंपन्यांना जिल्ह्यात काम करू देणार नाही!

Crop Insurance

शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने यांचा इशारा; पालकमंत्र्यांना दिले निवेदन

लातूर (Crop Insurance) : शेतकऱ्यांना पीकविमा न देणाऱ्या कुठल्याही विमा कंपन्यांना जिल्ह्यात काम करू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२२ पासून आतापर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही. तसेच सन २०२५ च्या हंगामासाठीही शेतकऱ्यांना एकही रुपया मिळालेला नाही. गेल्या तीन-चार वर्षांपासून एसबीआय आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड या खाजगी पीकविमा कंपन्या काम पाहत असून, या कंपन्यांवर घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यासाठी यापूर्वी आंदोलनेही करण्यात आली होती.

सन २०२५ हंगामातील शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा तात्काळ मंजूर करावा तसेच सन २०२६ मध्ये खाजगी कंपन्यांना पीकविमा योजनेचे काम न देता शासकीय कंपनीलाच हे काम देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे केली आहे.

यावर्षी अद्याप पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. त्यामुळे यंदा तरी शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे शासकीय एआयसी (AIC) कंपनीलाच काम द्यावे. तसेच रद्द करण्यात आलेले पाच ट्रिगर पुन्हा पीकविमा योजनेत लागू करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच स्थानिकांना पीकविमा कंपनीच्या कामकाजात सहभागी करून घ्यावे, एसबीआय आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करून त्यांच्या कथित घोटाळ्यांची चौकशी करावी, अशाही मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यापूर्वी जिल्हाधिकारी तसेच कृषिमंत्री भरणे मामा यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.

या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेना लातूर जिल्ह्यात कोणत्याही खाजगी पीकविमा कंपनीला काम करू देणार नाही, असा इशाराही सचिन दाने यांनी दिला आहे.