आसोला खु. ते डांगापूर मार्गे कारपा पांदन रस्त्याच्या कामात अनियमितता
मानोरा (Pandan Road Corruption) : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या आसोला खु. ते डांगापूर मार्गे कारपा पांदन रस्त्याच्या कामात लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारकर्ता मनोहर तुकाराम चव्हाण यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली असुन येत्या २० जुलै २०२६ पर्यंत चौकशी करून दोषीविरुद्ध कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे कळविले आहे. मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनानुसार, वाशिम जिल्ह्यातील अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात सन २०२५- २६ अंतर्गत आसोला खु. ते डांगापूर मार्गे कारपा मार्गावरील ३ कि.मी. पांदन रस्त्यासाठी शासनाकडून लाखो रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र या कामात कंत्राटदारांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कमिशनबाजीच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची थातूरमातूर कामे केली आहेत. रस्त्याच्या कामासाठी कोणत्याही शेतकऱ्याची संमती न घेता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मानोरा यांनी बोगस प्रकारे कामे केली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी जाण्यासाठी खोल नाली न केल्यामुळे पावसाळ्यात पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाणार आहे. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार या कामाची लांबी, रुंदी व खोलीकरण करण्यात आलेले नाही. कामात कुठल्याही प्रकारचे पूल व नाला पाईप बसविण्यात न आल्याने हा रस्ता केवळ दिखावा आणि कमिशनबाजीमुळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कामाचे टेंडर मंगरूळपीर तालुक्यातील ठेकेदाराच्या नावावर आहे. संबंधित ठेकेदाराने आपल्या जवळचा व्यक्तीची ठेकेदार म्हणून नेमणूक थातूर मातूर पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, या प्रकरणात शासनाची फसवणूक झाल्याने संबंधित विभागाने तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, कामाची वरिष्ठ स्तरावरून येत्या २० जुलै २०२६ पर्यंत कार्यवाही न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करणार असुन चौकशी होईपर्यंत देयके थांबवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या कामासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सईताई डहाके आणि धर्मगुरू मा. आ. बाबूसिंग महाराज राठोड यांनाही निवेदन देण्यात आले आहे.