Collector Rahul Gupta

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला गती द्या: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta

हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, साठवण तलाव, उच्च पातळी बंधारे, लिगो प्रकल्प तसेच अन्य विकास कामांच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीमती मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, सर्व उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक प्रशांत बिलोलीकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या भूसंपादन प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये जलसंपदा प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, उच्च पातळी बंधारे, साठवण तलाव आदी प्रकल्पांतील प्रलंबित मावेजा वाटप, भूसंपादन मोजणी, लिगो प्रकल्पासंदर्भातील भूसंपादन प्रक्रिया तसेच इतर अनुषंगिक बाबींची चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी वाटाघाटीद्वारे समितीसमोर ठेवावयाची प्रकरणे, दर निश्चिती, निवाडा पारित झालेल्या प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके, ताबा घेतलेल्या जमिनींच्या मावेजा वाटपाची स्थिती तसेच प्राधिकरणाकडे पाठवावयाच्या प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेतला. भूसंपादन प्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरळीत व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया गतीमान करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.