अकोला शहरात भीषण आग; रामदासपेठमधील ‘सिटी हॉस्पिटल’ला अचानक आग
रुग्णांना बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न; शहरात खळबळ
अकोला (City Hospital) : अकोला शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या रामदासपेठ परिसरातील ‘सिटी हॉस्पिटल’ला आज अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आग लागल्यावेळी रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेणारे अनेक रुग्ण दाखल होते.
घटनेनंतर रुग्णालय प्रशासन, सुरक्षा रक्षक आणि स्थानिक नागरिकांकडून रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले. विशेषतः अतिदक्षता विभाग (ICU) आणि जनरल वॉर्डमध्ये असलेल्या गंभीर रुग्णांना प्रथम सुरक्षित स्थळी हलवण्यावर भर देण्यात आला.
आगीची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. रामदासपेठ परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.
आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की अन्य कारण आहे, याचा तपास सुरू आहे. घटनेची तीव्रता पाहता प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.