लातूर शहरातून आजूबाजूच्या गावांकडे सुरू असलेली महा

बंद केलेली शहर बस सेवा तात्काळ सुरू करा!

City Bus Service

भाजपा जिल्हा कामगार मोर्चाची मागणी

लातूर : लातूर शहरातून आजूबाजूच्या गावांकडे सुरू असलेली महानगरपालिकेची सिटी बस सेवा गेल्या सहा दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ही बस सेवा तात्काळ सुरू करावी, अन्यथा महानगरपालिकेला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाने गुरुवारी (दि. ३०) दिला आहे.

यासंदर्भात भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चिवडे पाटील यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येणारी सिटी बस सेवा काही कारणास्तव बंद करण्यात आली आहे.

या बससेवा बंद असल्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणारे शेतकरी, मजूर तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण झाले असून सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

महानगरपालिका वारंवार कधी बस सेवा सुरू तर कधी बंद करत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सिटी बस सेवा नियमितपणे सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

बंद करण्यात आलेली सिटी बस सेवा दोन दिवसांच्या आत पुन्हा सुरू करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा, लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने महानगरपालिकेला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चिवडे पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.