CIDCO Lottery 2026: सिडकोच्या 8,795 ईडब्ल्यूएस घरांची संगणकीय सोडत जाहीर; हजारो अर्जदारांचे घराचे स्वप्न साकार
तळोजा, कळंबोली, खारघर, उलवे आणि खारकोपरमधील सदनिकांसाठी पारदर्शक पद्धतीने लॉटरी; इतर प्रवर्गांची सोडत उच्च न्यायालयाच्या आदेशापर्यंत स्थगित
नवी मुंबई: सिडकोच्या बहुप्रतिक्षित 'माझे पसंतीचे सिडकोचे घर, माझा पहिला चॉइस' योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या 8,795 सदनिकांची संगणकीय सोडत अखेर सोमवारी पार पडली. घर मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो अर्जदारांसाठी हा दिवस आनंदाचा ठरला असून, पात्र लाभार्थ्यांची यादी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ही गृहनिर्माण योजना डिसेंबर 2025 मध्ये जाहीर करण्यात आली होती. यामध्ये तळोजा, कळंबोली, खारघर, उलवे आणि खारकोपर या नवी मुंबईतील महत्त्वाच्या भागांमध्ये ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. या परिसरांचा वेगाने होत असलेला विकास आणि मोक्याचे स्थान यामुळे योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
या योजनेअंतर्गत एकूण 8,795 सदनिका उपलब्ध होत्या. त्यासाठी 10 हजार 832 अर्ज प्राप्त झाले होते. सुरुवातीला काही कारणांमुळे लॉटरीची प्रक्रिया रखडली होती. मात्र आता संगणकीय प्रणालीद्वारे कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ही सोडत पूर्ण करण्यात आल्याचा दावा सिडकोने केला आहे.
सोडतीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. लॉटरीत निवड झालेल्या पात्र अर्जदारांची नावे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, ही सोडत केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील सदनिकांसाठीच आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, इतर प्रवर्गातील सदनिकांची लॉटरी अद्याप झालेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत त्या प्रवर्गांची सोडत स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आली आहे.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल यांच्या हस्ते संगणकीय सोडत पार पडली. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असलेल्या या परिसरांचा वेगाने होत असलेला विकास लक्षात घेता या घरांना मोठी मागणी होती. यापूर्वी या घरांच्या किंमतीवरून वाद निर्माण झाला होता. ही त्या घरांसाठीची दुसरी लॉटरी ठरली आहे.