देऊळगाव राजा पोलिसांची कारवाई; अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला, जनजागृतीची गरज अधोरेखित
देऊळगाव राजा (Child Marriage Prevention) : देऊळगाव राजा पोलीसांनी तत्परता दाखवत ग्राम किन्ही पवार येथे होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. दिनांक 02.05.2026 रोजी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे ऑनलाईन CCTNS कंप्लेंट प्राप्त झाली होती. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते की, ग्राम किन्हीपवार येथे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचा दिनांक 03.05.2026 रोजी विवाह होणार आहे.
सदर बाब गंभीर असल्याने पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी मा. श्री निलेश तांबे (पोलीस अधीक्षक, बुलढाणा), श्री श्रेनीक लोढा (सहाय्यक पोलीस अधीक्षक, खामगाव), श्री अमोल गायकवाड (अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा), मा. मनिषा कदम मॅडम (उपविभागीय पोलीस अधिकारी, देऊळगाव राजा) व मा. संतोष खाडे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मेहकर) यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
यानंतर सदर प्रकरण पोउपनि राजकुमार मोहोळकर यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांनी पोस्टाफ पोहेकॉ समाधान गिते (बनं. 1973), मपोकॉ शितल नांदे (बनं. 2668) व चालक पोहेकॉ विजय दराडे (बनं. 53) यांच्या मदतीने शासकीय वाहनाने ग्राम किन्ही पवार येथे धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 15 वर्षे 06 महिने वयाच्या मुलीचा शोध घेतला असता ती आई-वडिलांसह आढळून आली. त्यावेळी त्या ठिकाणी विवाहासंबंधी विधी सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करत विवाह प्रक्रिया थांबवली. या प्रकरणी पुढील प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली असून सदर बालविवाह रोखण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथील पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि राजकुमार मोहोळकर, मपोउपनि विकार पटेल, एएसआय/1641 प्रमोद मुळे, पोहेकॉ/137 रामकिसन गिते, पोहेकॉ/1973 समाधान गिते, मपोकॉ/2668 शितल नांदे आणि चालक पोहेकॉ/53 विजय दराडे यांनी केली.
दरम्यान, देऊळगाव राजा पोलीसांनी आवाहन केले आहे की, 18 वर्षांखालील मुली व 21 वर्षांखालील मुलांचे विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारचे प्रकार आढळल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियम-2006 अंतर्गत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.