Increased property taxes: शिवसेनाने चिखली नगरपालिक

वाढीव मालमत्ता कर तात्काळ रद्द करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

Increased property taxes

चिखली (Increased property taxes) : चिखली नगरपालिकेकडून करण्यात आलेल्या मालमत्ता कर वाढीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेत वाढीव मालमत्ता कर तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जनतेच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी उपाध्यक्ष श्रीराम सखाराम झोरे यांनी दिला आहे. याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे झोरे यांनी म्हटले आहे की, महागाईमुळे नागरिक आधीच आर्थिक अडचणीत असताना मालमत्ता करात करण्यात आलेली अवास्तव वाढ ही अन्यायकारक आहे. शहरातील नागरिकांना पुरेशा मूलभूत सुविधा मिळत नसताना कर वाढविण्याचा निर्णय जनतेच्या खिशावर डाका टाकणारा असल्याचा आरोप त्यांनी केला. चिखली शहरात स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, नियमित पाणीपुरवठा, वाहतूक शिस्त, अतिक्रमण निर्मूलन आणि बाजारपेठेतील सुविधांसह अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. नगरपालिका प्रशासनाकडे कर वसुलीसाठी पुरेसे कर्मचारी नसल्याचे सांगितले जाते, मग नागरिकांना आवश्यक सेवा व सुविधा कशा दिल्या जाणार, याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. नगरपालिका दर २० दिवसांनी पाणीपुरवठा करते, घंटागाडी नियमित येत नाही, अनधिकृत फ्लेक्स व बॅनर, बेशिस्त पार्किंग आणि अतिक्रमण यांसारख्या समस्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करत, या समस्या सोडविणे हे प्रशासनाचे कर्तव्य आणि नागरिकांचा अधिकार असल्याचे झोरे म्हणाले. कर थकबाकीवर वर्षाच्या सुरुवातीपासून दरमहा दोन टक्के म्हणजेच वार्षिक २४ टक्के व्याज आकारले जाते. या व्याजदराचाही फेरविचार करणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, वाढीव मालमत्ता कराविरोधात (Increased property taxes) २२ जून २०२६ रोजी चिखली नगरपरिषद येथे निवेदन देण्यात येणार असून, शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन श्रीराम झोरे यांनी केले आहे. "जनतेच्या हितासाठी, चिखलीकरांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि अवास्तव मालमत्ता कर वाढीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरणार असून, जनतेवरील हा आर्थिक अन्याय तात्काळ थांबवावा. अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल," असा इशाराही झोरे यांनी दिला आहे.