Drug Free India: अमली पदार्थांचे सेवन टाळून व्यसनम

व्यसनमुक्त तरुणाईतूनच होईल खऱ्या सक्षम भारताची सुरुवात : न्यायाधीश खान

Drug Free India

सुनील रामसिंह चुनावाले आयुर्वेद महाविद्यालयात ‘नल्सा डॉन’ अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिर

चिखली (Drug Free India) : “आजचे युवक हे उद्याचे सक्षम भारतीय नागरिक आहेत. त्यांनी देशातील थोर व्यक्तींच्या विचारांना आत्मसात करून कठोर परिश्रमाने आपले उज्ज्वल भविष्य घडवावे व सशक्त भारत निर्माण करावा. अमली पदार्थांचे सेवन टाळून व्यसनमुक्त जीवनाकडे वाटचाल केल्यानेच खऱ्या अर्थाने व्यसनमुक्त भारताची सुरुवात होईल,” असे प्रतिपादन चिखली न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आय. ए. वाय. ए. खान यांनी केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) द्वारे राबविण्यात येणाऱ्या ‘अमली पदार्थांचे सेवन व अमली पदार्थ मुक्त भारत’ अभियानांतर्गत २४ जून २०२६ रोजी सुनील रामसिंह चुनावाले आयुर्वेद महाविद्यालय, चिखली येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘ड्रग अवेयरनेस अँड वेलनेस नेव्हिगेशन फॉर ड्रग फ्री इंडिया (NALSA DAWN)’ हा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, देशातील अमली पदार्थांचे व्यसन रोखणे, पीडितांना कायदेशीर मदत व पुनर्वसन उपलब्ध करून देणे आणि समाजाला व्यसनमुक्त करण्याचा त्यामागील मुख्य उद्देश आहे. तालुका विधी सेवा समिती व चिखली वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सतीश गवई होते. यावेळी उपाध्यक्षा अॅड. राधिका मिनासे (गनोजेकर), अॅड. वैशाली बोराडे (भंडारे), अॅड. के. एस. हनवते, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पंकज शेटे तसेच प्रशासकीय अधिकारी पवन लढ्ढा उपस्थित होते. मार्गदर्शन करताना अॅड. राधिका मिनासे (गनोजेकर) यांनी अमली पदार्थ बाळगणे, सेवन करणे व त्याचा व्यापार करणे यासंदर्भातील कठोर कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. अॅड. के. एस. हनवते यांनी अमली पदार्थांमुळे तरुणांच्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनेचा उद्देश समजावून सांगितला. अॅड. सतीश गवई यांनी व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. अॅड. वैशाली बोराडे (भंडारे) यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व आणि आधुनिक काळातील त्याची गरज यावर प्रकाश टाकला. महाविद्यालयाच्या वतीने डॉ. पंकज शेटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवनकुमार लढ्ढा यांनी केले. सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अश्विनी अशोक माळी हिने केले, तर आभार प्रदर्शन हर्षल वाशिमकर यांनी केले. या शिबिरास न्यायालयीन कर्मचारी राजेश अघमे, अतुल देशमुख यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.