छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा
समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन; विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
नांदेड (Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड यांच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने समता दिंडी, अभिवादन कार्यक्रम, विविध शासकीय योजनांचा लाभवाटप सोहळा तसेच नशामुक्तीची शपथ आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड संदीप माळोदे यांनी पुष्पहार अर्पण करून केली. तर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड शिवानंद मिनगीरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर आमदार अमर राजूरकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आणि सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून समता दिंडीचे उद्घाटन करण्यात आले.
समता दिंडीत आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे, सेवानिवृत्त वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अशोक गोडबोले, गणेश तादलापूरकर, सेवानिवृत्त लष्करी कर्मचारी तसेच विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
समता दिंडीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा (स्नेहनगर) ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा असा होता. शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी सामाजिक न्याय दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. आमदार आनंदराव बोंढारकर यांनीही उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला, तर सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी शाहू महाराजांनी शिक्षण आणि आरक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यानंतर आमदार बालाजीराव कल्याणकर आणि सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
सकाळी ११ वाजता सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामाजिक न्याय दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात भारत नशामुक्ती अभियानांतर्गत उपस्थितांनी नशामुक्तीची शपथ घेतली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना डी.डी.चे वाटप करण्यात आले. या लाभार्थ्यांमध्ये दीपाली गंगाधर लांडगे (एम.कॉम द्वितीय वर्ष), प्रज्ञा सुभाष सावते (जी.एन.एम. द्वितीय वर्ष), कोमल मनोज भालेराव (इयत्ता १२ वी), पवार संजीवनी नागोराव (इयत्ता १२ वी) आणि अविनाश सोपान बरुडे (इयत्ता १२ वी) यांचा समावेश होता.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेअंतर्गत सहा लाभार्थ्यांना जमीन वाटप आदेश देण्यात आले. लाभार्थ्यांमध्ये लक्ष्मीबाई नरसिंग पेंटावार (रा. माडवी, ता. किनवट), विमलबाई देवराव घमडवार (रा. शिरपूर, ता. किनवट), संटीबाई विवेक दर्शनवाड (रा. मांडवी, ता. किनवट), गौतम मारोती नगराळे (रा. माडवी, ता. किनवट), कुंटलवार आनंदराव उषन्ना (रा. माडवी) तसेच चंद्रकांत बाबाराव दिसलवार (रा. मांडवी, ता. किनवट) यांचा समावेश होता.
याशिवाय, मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत तीन बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.
सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा घेत समाजात सामाजिक न्याय, समता आणि बंधुता अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. बार्टी समता दूतांनीही शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक जे. टी. काळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी केले. सूत्रसंचालन तालुका समन्वयक अंजली नरवाडे यांनी केले, तर आभार एल. एस. गायके यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.