Chandrapur Man Death: मली पदार्थ तस्करी प्रकरणातील

विषप्राशन करून पोलिस ठाण्यात आलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

Chandrapur Man Death

चंद्रपूर (Chandrapur Man Death) : अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील चौकशीदरम्यान पोलिसांकडून होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून चंद्रपूर शहरातील एका व्यक्तीने आज शुक्रवार दि.१६ जुलैला दुपारी शहर पोलीस ठाण्यात विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. संबंधित व्यक्तीला गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. भिवापूर परिसरातील एका गांजा तस्कराला अटक करून त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला होता. या (Chandrapur Man Death) प्रकरणाच्या अनुषंगाने चंद्रपूर शहरातील रय्यतवारी कॉलरी येथील रहिवासी दिलीप यादव (वय ४६) यांना पोलिसांकडून वारंवार चौकशीसाठी बोलावले जात होते. मृतकाचा मुलगा कृष्णा यादव याने आरोप केला आहे की, पोलीस वारंवार घरी येऊन वडिलांवर दबाव टाकत होते तसेच पैशांची मागणी करत होते. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. शुक्रवारी दुपारी सुमारे १.३० वाजताही काही पोलीस कर्मचारी घरी आले आणि त्यांना शहर पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानंतर दिलीप यादव यांनी पोलीस ठाण्यात जाऊन विषप्राशन केल्याचे सांगितले जात आहे. आत्मघातकी पाऊल उचलण्यापूर्वी मृतक दिलीप यादव यांनी ३९ सेकंदांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी शहर पोलीस ठाण्यातील रुपेश आणि भावना नावाच्या दोन पोलीस कर्मचार्‍यांकडून पैशांसाठी फोन येत असल्याचा आरोप केला आहे. 'मी काहीच केले नाही, तर पैसे का द्यायचे?' असा सवाल करत त्यांनी आपण उचलत असलेल्या टोकाच्या पावलासाठी शहर पोलीस ठाणे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

'संबंधित व्यक्ती बाहेरूनच विषप्राशन करून पोलीस ठाण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो वाहन पार्क करून पोलीस ठाण्यात येताना दिसतो. आत आल्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या. तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध विविध स्वरूपाचे १३ गुन्हे दाखल आहेत. त्याने केलेल्या आरोपांचीही सखोल चौकशी करण्यात येईल.' -आयुष नोपाणी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर