१५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कालव्यात पाणी; अवघ्या दहा तासांत घोडाझरी उपकालवा फुटला
तळोधी बा.जवळील ओवाळा गावानजीक घटना; हजारो लिटर पाणी शेतात शिरल्याने धानपिक व पऱ्हयांना फटका, बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न
तळोधी बा. (चंद्रपूर) : तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत घोडाझरी उपकालव्यात सोमवारी (दि. २० जुलै) सकाळी ७ वाजता प्रथमच पाणी सोडण्यात आले. ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला; मात्र अवघ्या नऊ ते दहा तासांत तळोधी बा.जवळील ओवाळा गावानजीक कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये घुसले. सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठपर्यंत सुमारे तीन तास पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू राहिल्याने धानपिक व पऱ्हयांना नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून कालव्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्यात सोमवारी सकाळी ७ वाजता विधिवत पूजा करून पाणी सोडण्यात आले होते. या कालव्यामुळे ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार असल्याने शेतकरी आनंद व्यक्त करत होते. मात्र हा आनंद काही तासांतच मावळला.
सायंकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास तळोधी बा. परिसरातील ओवाळा गावाजवळ कालव्याला मोठे भगदाड पडले. त्यातून मोठ्या वेगाने पाणी बाहेर पडून आसपासच्या शेतांमध्ये शिरले. साडेपाच ते साडेआठ या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. त्यामुळे धानपिकांसह इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा नागभीड तालुक्यात पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. अनेक ठिकाणी धानाची रोवणी अद्याप पूर्ण झालेली नाही. अशा परिस्थितीत कालव्यात तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकरी सातत्याने करत होते. त्यानुसार सोमवारी सकाळी पाणी सोडण्यात आले; मात्र त्याच दिवशी सायंकाळी कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.
सुमारे १५ वर्षे सुरू असलेल्या या प्रकल्पाचे काम मागील वर्षी पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र पाणी सोडल्याच्या पहिल्याच दिवशी कालवा फुटल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेआठच्या सुमारास कालव्यातील पाणी बंद करण्यात आले. मात्र ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथून कालव्यात येत असलेले पाणी रात्रभर फुटलेल्या ठिकाणातून शेतांमध्ये वाहत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या प्राथमिक माहितीनुसार, कालवा दुरुस्त करण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागू शकतात. त्यामुळे या कालावधीत सिंचन व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.