बॅनर्सवर भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख करण्यात आ

भावी कॅबिनेट मंत्री'च्या बॅनर्समुळे धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत

Birthday Banners

माजलगाव मतदारसंघात विविध ठिकाणी झळकले बॅनर्स; गेल्या वर्षी मंत्रिपदाचा दिला होता राजीनामा

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या बॅनर्सवर "भावी कॅबिनेट मंत्री" असा उल्लेख करण्यात आल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

हे बॅनर्स माजलगाव शहरासह परिसरातील प्रमुख चौकांमध्ये लावण्यात आले आहेत. शुभेच्छुक म्हणून ऊसतोड कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा ब्रम्हगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल राधे कांबळे यांचे नाव त्यावर नमूद करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच या मजकुरामुळे राजकीय चर्चांनाही नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ४ मार्च २०२५ रोजी धनंजय मुंडे यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप झाल्याने राज्यातील राजकारण तापले होते. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केल्यानंतर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर तसेच तब्येत ठीक नसल्याचे कारण देत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला होता. या प्रकरणात आरोपी मुंडे यांचे जवळचे असल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्याचवेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यास उशीर केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

अशा पार्श्वभूमीवर आता वाढदिवसानिमित्त समर्थकांनी "भावी कॅबिनेट मंत्री" असा उल्लेख असलेले बॅनर्स लावल्याने बीडसह राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.