BEST चा मोठा निर्णय! मुंबईत येणार 1,500 एसी इलेक्ट्रिक मिडी बस; 400 वरून 525 बसमार्गांचा विस्तार
PM E-Drive योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने होणार बसांचा समावेश; अरुंद रस्ते, मेट्रो-रेल्वे स्टेशन आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला मिळणार मोठी चालना
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, पर्यावरणपूरक आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने बेस्ट समितीने 1,500 एसी इलेक्ट्रिक मिडी बस खरेदीला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या PM E-Drive योजनेअंतर्गत या बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असून, या निर्णयामुळे शहरातील बससेवेत मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे.
या नव्या बसांच्या समावेशानंतर सध्या कार्यरत असलेल्या सुमारे 400 बसमार्गांची संख्या वाढून 525 पर्यंत पोहोचणार आहे. तसेच काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेले काही बसमार्ग पुन्हा सुरू करण्याचाही बेस्टचा मानस असल्याची माहिती बैठकीनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
नव्या इलेक्ट्रिक मिडी बस आकाराने लहान असल्यामुळे त्या अरुंद रस्ते, छोट्या गल्ल्या तसेच डोंगराळ भागांमध्ये सहज धावू शकतील. ज्या भागांमध्ये मोठ्या बस पोहोचू शकत नाहीत, त्या ठिकाणीही आता बससेवा उपलब्ध होणार असल्याने अनेक नागरिकांना याचा थेट लाभ मिळणार आहे.
बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सांगितले की, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 2027 पर्यंत मुंबईत 10 हजार बस उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. प्रत्येक एक हजार लोकसंख्येमागे 0.6 बस उपलब्ध करण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या 1,500 इलेक्ट्रिक बस 2026 आणि 2027 या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत. त्यापैकी सुमारे 250 बस यावर्षी डिसेंबरअखेरपर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या बस खरेदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर 30 ऑक्टोबर 2025 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
नव्या 9 मीटर लांबीच्या इलेक्ट्रिक मिडी बस विशेषतः फीडर सेवा आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन विकसित करण्यात आल्या आहेत. मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन आणि इतर प्रमुख सार्वजनिक वाहतूक केंद्रांपर्यंत प्रवाशांना सहज पोहोचता यावे, यासाठी या बस महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. लहान आकारामुळे गर्दीच्या आणि अरुंद मार्गांवरही त्यांची वाहतूक सुलभ होणार आहे.
या बसमध्ये जमिनीपासून अवघ्या 400 मिमी उंचीचा अल्ट्रा-लो फ्लोअर देण्यात आला आहे. त्यामुळे दिव्यांग नागरिक, विशेषतः व्हीलचेअरचा वापर करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये चढणे आणि उतरणे अधिक सोपे होईल. सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे.
तांत्रिकदृष्ट्याही या बस अत्याधुनिक असणार आहेत. त्यामध्ये लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी, फुल एअर सस्पेन्शन, फास्ट डीसी चार्जिंग, 360 अंश सीसीटीव्ही कॅमेरे, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) तसेच बॅटरी विभागात आग लागल्यास तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी फायर डिटेक्शन अँड सप्रेशन सिस्टीम बसवण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत ग्रीनसेल मोबिलिटी कंपनीकडून 31 पेक्षा अधिक प्रवासी क्षमता असलेल्या 1,050 EKA इलेक्ट्रिक बस पुरवल्या जाणार आहेत. तर साई ग्रीन कंपनी 33+1 आसनक्षमतेच्या 450 Switch EiV9 इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देणार आहे.
बेस्टच्या ताफ्यात या सर्व 1,500 बस चार टप्प्यांत दाखल केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 225, दुसऱ्या टप्प्यात 375, तिसऱ्या टप्प्यात 450 आणि चौथ्या टप्प्यात आणखी 450 बस विविध बेस्ट डेपोंमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना स्वच्छ, आधुनिक आणि अधिक परिणामकारक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.