Balsond Gram Panchayat: पप्पू चव्हाण मित्र मंडळाने

बळसोंड ग्रामपंचायत हद्दीत पप्पू चव्हाण मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम; प्रत्येक घरी झाडांचे वाटप

Balsond Gram Panchayat

हिंगोली (Balsond Gram Panchayat) : शहरालगतच्या बळसोंड ग्रामपंचायत हद्दीत पप्पू चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. माऊली नगर, रामकृष्ण नगरसह विविध भागातील प्रत्येक घराला दोन झाडांचे मोफत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, ही झाडे दोन वर्षे जतन करून संगोपन करणाऱ्या नागरिकांची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याची घोषणा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाढते तापमान, घटणारे हरित क्षेत्र आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने बळसोंड ग्रामपंचायत हद्दीत पप्पू चव्हाण मित्र मंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे. पप्पू चव्हाण मित्र मंडळाच्या सदस्यांनी माऊली नगर, रामकृष्ण नगर तसेच इतर परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्येकी दोन झाडांचे वाटप केले. केवळ झाडे वाटून न थांबता, ती पुढील दोन वर्षे जपणाऱ्या आणि संगोपन करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन म्हणून घरपट्टी व नळपट्टी माफ करण्याची योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती होत असून झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही वाढणार आहे. त्यामुळे या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांकडून तसेच परिसरातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.