औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास गती
शिखर समितीकडे 182.83 कोटींचा एकत्रित प्रस्ताव शिखर समितीकडे होणार सादर
औंढा नागनाथ (Aundha Nagnath Pilgrimage) : औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे आढावा बैठक पार पडली. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत एकूण १८२.८३ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता प्रदान करण्यात आली असून, यामुळे औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुदेश देशमुख, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे आदी अधिकारी उपस्थित होते. श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या (Aundha Nagnath Pilgrimage) सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्रशासनाने विकास आराखड्याला गती दिली आहे. नियोजन विभागाच्या दि. ३० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये पहिल्या टप्प्यात १५.२१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली असून त्यापैकी ७.५० कोटी रुपयांचा निधी दि. १८ मार्च २०२६ रोजी उपलब्ध झाला आहे. या निधीतून सध्या विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. दरम्यान, दि. २५ मार्च रोजी झालेल्या बैठकीत (Aundha Nagnath Pilgrimage) श्री क्षेत्र औंढा नागनाथच्या दुसऱ्या टप्प्यातील २६६.६१ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत उच्चाधिकार समितीने पुरातत्त्व विषयक कामांना प्राधान्य देत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुरातत्त्व विभागाने ७६.५५ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा सादर केला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य परिसर विकासासाठी १०६.२८ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. या आढावा बैठकीत प्रकल्प अहवाल निश्चित कार्यान्वयीन यंत्रणांमार्फत तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत प्रस्तावित वस्तुसंग्रहालयाच्या आराखड्यापूर्वी उत्तर प्रदेशातील पिपरवाहा (जि. सिद्धार्थनगर) येथील वस्तुसंग्रहालयाची पाहणी, प्रस्तावित प्रसाधनगृहाच्या रचनेसाठी मुंबईतील कान्हेरी लेणी परिसरातील प्रसाधनगृहाची पाहणी करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी जिल्हा प्रशासनाला दिले. दर्शन मंडपाच्या छताची रचना मंदिराच्या पारंपरिक नक्षीकामाशी सुसंगत ठेवावेत. तसेच प्रतीकात्मक द्वादश ज्योतिर्लिंग प्रकल्प परिसरात पर्यटकांसाठी आकर्षक सेल्फी पॉइंट विकसित करण्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देशही समितीने दिले. औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राला (Aundha Nagnath Pilgrimage) सध्या प्राप्त असलेल्या ‘ब’ दर्जाच्या ऐवजी ‘अ’ दर्जा प्रदान करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. तसेच याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यासह औंढा नागनाथ देवस्थान ट्रस्टच्या प्रशासनाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. ट्रस्टच्या अध्यक्षपदी सध्या तहसीलदार, औंढा नागनाथ यांची नियुक्ती असून त्याऐवजी जिल्हाधिकारी, हिंगोली यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याबाबत विचार करण्याचे निर्देश वित्त सचिव आणि पालकमंत्री कार्यालयामार्फत संबंधित यंत्रणांना देण्यात आले. या निर्णयांमुळे औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा (Aundha Nagnath Pilgrimage) धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन विकास अधिक वेगाने होण्यास मदत होणार असून भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. औंढा नागनाथ देवस्थानाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वाहनतळासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाच्या जागेचा वापर करून वाहनतळाची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत दिले.