अमोल इंगळे यांची गृहपाल पदावर निवड; शेलूद गावात जल्लोषात स्वागत
ग्रामस्थांकडून बैलगाडीतून मिरवणूक; युवकांनी अमोलचा आदर्श घ्यावा – आ. श्वेताताई महाले पाटील
चिखली (Amol Ingle) : आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणे अत्यंत कठीण बनले असताना चिखली तालुक्यातील शेलूद येथील अमोल गजानन इंगळे यांनी सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर सरळ सेवा भरतीतून एस-१४ श्रेणीत आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी मुलांच्या शासकीय वस्तीगृहात गृहपाल पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे शेलूद गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. अमोल इंगळे (Amol Ingle) यांच्या निवडीच्या आनंदात ग्रामस्थांनी बैलगाडीतून मिरवणूक काढली. ढोल-ताशांच्या गजरात व गुलाल उधळत गावातून स्वागत सोहळा पार पडला. या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चिखली शहराची आराध्य दैवत असलेल्या रेणुका मातेच्या यात्रोत्सवात इंगळे परिवाराकडून देवीला पहिले मानाचे पातळ अर्पण करण्यात येते. त्या परंपरागत धार्मिक व सामाजिक वारसा लाभलेल्या परिवारातील अमोल इंगळे यांनी मिळवलेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान, २४ मे २०२६ रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी अमोल यांचे वडील गजानन इंगळे व आई सखुबाई इंगळे यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी “ग्रामीण भागातील युवकांनी अमोल इंगळे यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर यश संपादन करावे,” असे आवाहन केले. याच दिवशी रेणुका देवीची पातळ व वगडी नेण्यात येणाऱ्या नादुरुस्त रस्त्याच्या कामाचे उद्घाटनही आमदार महाले यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मार्गाच्या कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ भाजप नेते सुरेशआप्पा खबुतरे, सरपंच मंगेश इंगळे, गोपाल आप्पा शेटे, पत्रकार गोपाल तुपकर, विजयसिंग गाडेकर, संतोष नाना इंगळे, सरपंच सुनील चिंचोले, संतोष इंगळे, राजू इंगळे, समाधान वाघमारे, नितीन पाटील, नगरसेवक दीपक वाधवाणी, सुभाष खरात, ज्ञानेश्वर मोरे, ज्ञानेश्वर इंगळे, विजय वायकोस, गोपाल नवले, रामेश्वर इंगळे, राजेश इंगळे, संजय इंगळे, भारत केसकर, अमोल नवले, श्रीकांत केसकर, नारायण इंगळे, विशाल इंगळे, दिलीप केसकर, दीपक कदम, उमेश जांभळे, सदानंद शेळके, मोसीम बागवान, गफार बागवान, राजू पठाण, कदीर शेख, भारत सवडे, नितीन सावंत, विराट शेळके, विष्णू शेळके, त्र्यंबक शेळके, अमोल भंडारे, उमेश इंगळे, शुभम इंगळे, दत्तात्रय इंगळे, गोविंदा इंगळे, राम केसकर यांच्यासह शेलूद गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.