Amravati Pig Attack: ज्येष्ठ नागरिकावर रानडुकराने

ज्येष्ठ नागरिकावर डुकराचा प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

Amravati Pig Attack

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण शहरात बिबटनंतर रान डुकराची दहशत

अमरावती (Amravati Pig Attack) : शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात आज पहाटे एका ज्येष्ठ नागरिकावर रानडुकराने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात संबंधित वृद्ध नागरिक श्री पिंजरकर हे गंभीर जखमी झाले असून, परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीती व चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आज दिनांक २४ जून रोजी पहाटे सव्वा पाचच्या वाजताच्या सुमारास आशियाड कॉलनी येथील रहिवासी श्री पिंजरकर हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. कॉलनीतील विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेतून अचानक आलेल्या एका रानडुकराने त्यांच्यावर भीषण हल्ला (Amravati Pig Attack) चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, डुकराने श्री पिंजरकर यांच्या संपूर्ण अंगावर ठिकठिकाणी गंभीर चावे घेतले. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांना आपले एक बोटही गमावावे लागले आहे. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेची थरारक दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेची तीव्रता पाहून नागरिकांच्या अंगावर काटा येत आहे. 

बिबटनंतर रानडुकराची दहशत: शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मागील वर्षी बिबटने प्रवेश केला होता तेंव्हा त्या बिबट्याने याच कॉलनीत प्रवेश केला होता. बिबट्या पाठोपाठ नाल्याच्या लगत डुकरांचा संचार असल्याने यावेळी डुकरांची दहशत पसरली आहे. भविष्यात पुन्हा या डुकरांच्या मागावर बिबट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रशासनाला साकडे: गणपती  मंदिरासमोरील ज्या मोकळ्या जागेतून जनावरे व डुकरांचा वावर होतो, त्या जागेभोवती त्वरित मजबूत संरक्षक भिंत (कंपाउंड वॉल) उभारण्यात यावी. नाल्यावरून जनावरे थेट कॉलनीत प्रवेश करत असल्याने, या नाल्यावर पूर्णपणे बंदिस्त आरसीसी गटर लाईनचे बांधकाम करण्याची मागणी आशियाड कॉलनीतील नागरिकांनी केली आहे.

सावधगिरी गरजेची: शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी सकाळ-संध्याकाळ फिरताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Amravati Pig Attack) जनावरांच्या किंवा डुकरांच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता पाहता चालताना सोबत नेहमी काठी किंवा लाकडी दांडा अवश्य ठेवावा. पहाटे अंधार असताना किंवा निर्जन ठिकाणी एकटे फिरणे टाळावे, सोबत इतर नागरिकांना ठेवावे.