अकोटातील अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार; जमानत अर्ज नामंजूर
अकोट : तेल्हारा तालुक्यातील अल्पवयीन १२ वर्षिय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणारे आरोपी मंगेश वानखडे, प्रविण वानखडे व शेजारील गजानन भोम या तीनही आरोपींचा जमानत अर्ज अकोट सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.आर. पठारे यांनी फेटाळून लावला. तेल्हारा पोलिस स्टेशनच्या फाईलवरील आरोपी मंगेश पांडुरंग वानखडे (४७), प्रविण पांडुरंग वानखडे (३६) व ज्याला पिडीता आबा म्हणायची तो गजानन जयदेव भोम (६८) तिघेही रा. आडसुळ फाटा यांनी सातव्या वर्गात शिकणार्या १२ वर्षीय बालिकेवर सतत लैंगिक अत्याचार केलेल्या प्रकरणात दाखल केलेला तीनही आरोपींचा अटकपूर्व जमानत अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. सर्व आरोपी अकोला कारागृहात २५/१२/२०२५ पासून बंदीस्त आहेत. या प्रकरणात १२ वर्षिय अल्पवयीन पिडीतेवर तीचे वडील, तीचे काका व गजानन भोम या तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असल्याने तेल्हारा तालुक्यातील हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जाला विरोध करतांना लेखी उत्तर व युक्तीवाद सादर केला. पिडीतेच्या वैद्यकिय तपासणीमध्ये सुध्दा तीच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे नमूद आहे. सरकार पक्ष हा खटला आरोपीला कारागृहात ठेवून जलदगतीने चालविण्यास तयार आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेता आरोपींचा जमानत अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकारी वकील अजित देशमुख यांनी केला. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने तीनही आरोपींचा अटकपूर्व जमानत अर्ज नामंजूर केला.