अकोला जंगलात सशस्त्र हल्ल्यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली
बार्शीटाकळी जंगलातून अटक; गुन्ह्यातील वाहने जप्त
अकोला : पोलीस स्टेशन खदान हद्दीत घडलेल्या सशस्त्र राडा व जीवघेण्या हल्ल्याच्या तीन गंभीर घटनांप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींना बार्शीटाकळी तालुक्यातील जंगल परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
४ एप्रिल रोजी खडकी व कौलखेड परिसरात धारदार शस्त्रांनी हल्ल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी पोलीस स्टेशन खदान येथे गुन्हा क्रमांक ८५५/२०२६, ८५६/२०२६ व ८५७/२०२६ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनांची गंभीरता लक्षात घेऊन तपासासाठी विशेष पथके गठित करण्यात आली होती.
एसडीपीओ पथक, खदान पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे तपास करत आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी अटक टाळण्यासाठी खडकी शेतशिवार व बार्शीटाकळीतील दुर्गम जंगल भागात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे ५ एप्रिल रोजी रात्री उशिरा छापा टाकून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक आरोपी
कबीर बलखंडे (१८), धनंजय ढाले (१९), शिवम उर्फ शुभम शेळके (१९), गौरव चव्हाण (२०) व एक विधी संघर्षग्रस्त बालक अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
जुन्या वादातून हल्ला
पोलीस चौकशीत आरोपींनी जुन्या आपसी वादातून हल्ला केल्याची कबुली दिली आहे. काही आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
जेजे अॅक्टनुसार कारवाई
अटक आरोपींना पुढील कारवाईसाठी खदान पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून, तपास सुरू आहे. अल्पवयीन आरोपीच्या पालकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता संबंधितावर जेजे अॅक्टनुसार प्रौढ म्हणून खटला चालविण्याची विनंती न्यायालयात केली जाणार आहे.