सायबर पोलीसांनी अकोल्यात ८० लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला
सायबर पोलिसांची धडक कारवाई; ८० लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश
अकोला (प्रतिनिधी): सायबर पोलीस स्टेशन अकोला यांनी तब्बल ८० लाख ५ हजार ८३० रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना मुंबईजवळील पालघर येथून अटक करून मोठी कारवाई केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान व डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत सायबर पोलिसांनी ही यशस्वी मोहीम पार पाडली.
या प्रकरणात फिर्यादी हिरासिंग स्वरूपसिंग ठाकूर यांनी १५ डिसेंबर २०२५ रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पार्टटाइम व फुलटाइम नोकरीच्या आमिषाला बळी पाडत, मसाजसाठी लागणारे साहित्य व औषधे खरेदी करून गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, असे सांगून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
या आमिषाला बळी पडत फिर्यादीने टप्प्याटप्प्याने ८० लाखांहून अधिक रक्कम गुंतवली. मात्र, कोणतेही साहित्य किंवा सेवा न मिळाल्याने तसेच पैसे परत मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. डिजिटल ट्रेल, तांत्रिक माहिती आणि आधुनिक साधनांच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सायबर पोलिसांचे पथक २७ मार्च रोजी पालघरकडे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ३० मार्च रोजी रूबीना फारूक शेख आणि अतिष दिलीप गुप्ता यांना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना पोलीस कोठडी
३१ मार्च रोजी आरोपींना अकोला न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक सरकारी अभियोक्ता अर्चना माणिकराव सूर्यवंशी यांनी सरकारतर्फे बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सहायक पोलीस निरीक्षक मनीषा तायडे, प्रशांत केदारे, कुंदन खराबे, तेजस देशमुख, किरण वाडेकर आणि श्रीहरी कराळे यांनी पार पाडली.
“हायप्रोफाईल महिला व मुलींसोबत मैत्री”चे आमिष
जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सुरुवातीला १ हजार रुपयांची नोंदणी फी भरायला सांगण्यात आली. त्यानंतर “हायप्रोफाईल महिला व मुलींसोबत मैत्री करून वेळ घालवणे” असे काम आणि दरमहा २० हजार रुपये पगाराचे आमिष दाखवून फिर्यादीला जाळ्यात ओढण्यात आले.