राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त गोजुबावी येथे पवार कुटुंबीयांकडून आदरांजली
विद्या प्रतिष्ठानमधील स्मृतीस्थळापासून गोजुबावी धावपट्टीपर्यंत श्रद्धांजली; सोशल मीडियावरील सुनेत्रा पवार यांच्या भावनिक पोस्टची चर्चा
बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीयांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळ तसेच गोजुबावी येथील दुर्घटनास्थळी जाऊन अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परिसरात अत्यंत भावूक वातावरण निर्माण झाले.
दादा...एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस मी अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला...घर , कुटुंब आनंदात असायचं, शुभेच्छांचा वर्षाव असायचा..पण आज तुमचा हाच दिवस 'जयंती' म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय.हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही अजिबात तयार होत नाही… pic.twitter.com/GZ6sxbQdzO
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) July 22, 2026जयंतीच्या पूर्वसंध्येला मध्यरात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे जाऊन अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर बुधवारी सकाळी त्या पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पाटील आणि विजया पाटील यांच्यासह बारामती विमानतळाजवळील गोजुबावी गावातील त्या धावपट्टीवर पोहोचल्या, जिथे अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा अपघात झाला होता.
कुटुंबीयांनी दुर्घटनास्थळी पुष्प अर्पण करून अजित पवारांना आदरांजली वाहिली. या वेळी सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या आठवणींनी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याने उपस्थितांमध्येही हळवे वातावरण निर्माण झाले.
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबीयांसह बारामती येथे त्यांच्या स्मृतिस्थळी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.#AjitPawar #SunetraAjitPawar… pic.twitter.com/eNFuqN3eWC
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) July 22, 2026अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री असताना २८ जानेवारी रोजी हा भीषण विमान अपघात झाला होता. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी ते बारामतीकडे येत असताना बारामती विमानतळालगतच्या गोजुबावी गावाच्या हद्दीत त्यांचे चार्टर्ड विमान धावपट्टीवर कोसळले. अपघातानंतर झालेल्या भीषण स्फोटात अजित पवार यांच्यासह वैमानिक, केबिन क्रू आणि त्यांच्या अंगरक्षकाचा मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेनंतर घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत झालेल्या चौकशीत अशा प्रकारच्या संशयाला पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.
दरम्यान, जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टही शेअर केली. "दादा... एवढी वर्ष तुमचा जन्मदिवस आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला. मात्र आज त्याच दिवसाला 'जयंती' म्हणून स्वीकारताना मन तुटून जात आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही माझा सर्वात मोठा आधार होता. तुमच्या आठवणी, विचार, लोकसेवेची भावना, शिस्त आणि प्रेम माझ्या प्रत्येक श्वासात कायम जिवंत राहील," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांच्या पवित्र स्मृतींना आदरपूर्वक अभिवादन केले.