'मिसिंग लिंक'वर पडलेल्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं; वर्षा गायकवाडांचा सरकारवर निशाणा, फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण
पहिल्याच पावसानंतर रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; मुख्यमंत्री म्हणाले- 'हे इंजिनिअरिंग प्रक्रियेचाच भाग'
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या कामावर पहिल्याच पावसानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पातील काही भागांमध्ये खड्डे पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया देत प्रकल्पाच्या गुणवत्तेचे समर्थन केले आहे.
Missing Link section of the Mumbai-Pune Expressway, which was inaugurated with great fanfare barely two months ago, has already developed several potholes, triggering criticism from commuters and road safety experts pic.twitter.com/ZWYDiJAMMB
— NextMinute News (@nextminutenews7) July 4, 2026१ मे रोजी उद्घाटन झालेल्या या प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पहिल्या पावसानंतर काही ठिकाणी खड्डे दिसून आल्याने कामाच्या दर्जाबाबत चर्चा सुरू झाली. याच मुद्द्यावर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले.
आपल्या अधिकृत 'X' पोस्टमध्ये वर्षा गायकवाड म्हणाल्या, "दोन महिन्यांत महामार्गावर खड्डे पडतात आणि मुख्यमंत्री त्याला टेस्टिंग म्हणतात. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या मिसिंग लिंकवर एवढ्या कमी कालावधीत खड्डे पडत असतील, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? पहिल्या पावसानंतर रस्त्याची चाचणी होत असेल, तर नागरिकांचा प्रवास हा प्रयोगाचा भाग झाला आहे का? आणि या काळात टोल वसुली थांबवण्यात आली होती का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दोन महिन्यांत महामार्गावर खड्डे... आणि मुख्यमंत्री म्हणतात, ही तर टेस्टिंग!कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर अवघ्या दोन महिन्यांत खड्डे पडतात... पण त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मुख्यमंत्री म्हणतात पहिल्या पावसानंतर रस्त्याची टेस्ट होते.म्हणजे आता प्रवाश्यांचा… pic.twitter.com/x2prVQjjan
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 4, 2026त्यांनी पुढे म्हटले की, खड्ड्यांची वस्तुस्थिती मांडणे ही टीका नसून वास्तव आहे. करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पात एवढ्या लवकर त्रुटी दिसत असतील, तर नागरिकांनी प्रश्न विचारणे स्वाभाविक आहे. मात्र, चुका मान्य करण्याऐवजी सरकार टीका करणाऱ्यांनाच लक्ष्य करत असल्याची टीकाही त्यांनी केली. "रस्ते मजबूत नसले तरी सरकारची स्पष्टीकरणे मात्र मजबूत आहेत," असा टोला त्यांनी लगावला.
यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मिसिंग लिंकच्या संपूर्ण मार्गावर खड्डे पडलेले नाहीत. केवळ कनेक्टरजवळ दोन ठिकाणी खड्डे आढळले असून काही जण या घटनेचे अनावश्यक मोठे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
फडणवीस यांनी सांगितले की, कोणताही मोठा रस्ता किंवा पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पहिल्या पावसात त्याची टिकाऊ क्षमता तपासली जाते. या प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक बाबी समोर येऊ शकतात आणि त्यानुसार आवश्यक दुरुस्ती केली जाते.
या संदर्भात त्यांनी "निंदकाचे घर असावे शेजारी" या म्हणीचाही उल्लेख केला. टीका होत असेल तर त्याचे स्वागत असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आवश्यक त्या सुधारणा निश्चितपणे करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते बांधकामातील तांत्रिक प्रक्रियेबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, नवीन रस्ता किंवा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात वापरण्यात आलेले मॅस्टिक ॲस्फाल्ट हळूहळू स्थिरावते. त्यानंतरच त्याची पूर्ण क्षमता विकसित होते. ही प्रक्रिया अभियांत्रिकीचा नैसर्गिक भाग असून, कुठेही त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर केल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.