Parbhani- Hingoli Elections: परभणी-हिंगोली स्थानिक

शेवटच्या क्षणी विप्लव बाजोरिया यांचा पता कट; सईद खान यांना शिवसेनेची उमेदवारी

Parbhani- Hingoli Elections

 

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक

हिंगोली (Parbhani- Hingoli Elections) : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आणि निवडणुकीत शिवसेनेने शेवटच्या क्षणी विप्लव बाजोरिया यांना बाजूला सारून पाथरी येथील सईद खान यांना उमेदवारी जाहीर केली. शेवटच्या दिवशी सईद खान व शिवसेना उबाठाचे डॉ. विवेक नावंदर यांच्यासह एकूण सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

या निवडणुकीत शिवसेनेत उमेदवारीसाठी मोठी चुरस झाली. शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी भाकरी फिरवीत पाथरी येथील सईद खान यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीमुळे शिवसेनेत उत्साह असला तरी भारतीय जनता पक्षात मोठी नाराजी आहे. पक्ष दिवसेंदिवस कडव्या हिंदुत्वाच्या वाटेने जात असताना सईद खान यांची उमेदवारी भारतीय पक्षाच्या जनता मतदारांना फारशी रुचली नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी तर्फ जाहीर झाल्याप्रमाणे परभणीच्या डॉ. विवेक नावंदर यांना उमेदवारी मिळाली. आघाडीकडे मतदारांची संख्या कमी असली तरी परभणीतून डॉ. नावंदर यांना मोठी मदत मिळेल असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत. या दोन प्रमुख उमेदवारांसह माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय जामकर, विश्वजीत बुधवंत, संग्राम जामकर व मेहराज खान पठाण यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी परत घेण्यासाठी चार जून पर्यंत मुदत असल्याने पुढील चित्र त्यानंतरच स्पष्ट होईल असा अंदाज आहे.

लढत तिरंगी होण्याचे संकेत संख्याबळानुसार महायुतीसाठी ही निवडणूक वरवर सोपी दिसत असली तरी तिरंगी लढत झाल्यास सईद खान यांची वाट बिकट असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जरी उमेदवारासोबत दिसत असले तरी संख्याबळ अधिक असूनही डावलल्या गेल्याचे दुःख राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार बोलून दाखवीत आहेत. परभणीतील अनेक बड्या नेत्यांचा सईद खान यांना चांगलाच विरोध आहे. वर्चस्वाच्या या लढाईत माजी आमदार सुरेश देशमुख यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राजकारणातील तडजोडी साठी 'मास्टर माईंड' मानल्या जाणाऱ्या सुरेश देशमुखानी नाराजांचा गठ्ठा जमविला तर ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.