नर्सी नामदेव में 19 मार्च से तीन दिन की संत नामदेव यात्रा शुरू हो रही है, जिसमें लाखों भाविक सम्मिलित होंगे।
नर्सी नामदेव येथे गुढीपाडव्या पासून नामाचा गजर
हिंगोली (Saint Namdev Yatra) : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पापमोचनी एकादशीच्या दिवशी १९ मार्च गुरुवार पासून तीनदिवसीय यात्रेला सुरवात होत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून लाखो भाविक संत नामदेव महाराजांच्या समाधी दर्शनसाठी दाखल होतील. परिसरातील चाळीस ते पन्नास गावातील दिंड्या यात्रेत दाखल होणार आहेत. हरि नामाच्या गजराने हे गाव तीन दिवस भक्तिरसात दंग होईल.
संत नामदेव महाराज (Saint Namdev Yatra) मंदिर संस्थानतर्फे यात्रा काळात विविध कार्यक्रम होतील. गुरुवारी सकाळी सातला शासकीय महापूजा मान्यवरांच्या उपस्थितीत होईल, नंतर पोलीस ठाण्यातर्फे संत नामदेव महाराजांच्या समाधीसमोर आहेर केला जाणार आहे. यावेळी संस्थानचे विश्वस्त व भाविक उपस्थित राहतील.
२० मार्च शुक्रवार रोजी ग्राम प्रदक्षिणा होणार आहे तसेच आलेल्या दिंड्याचे स्वागत केले जाणार आहे रात्री हरिजागर होणार आहे. २१ मार्च शनिवार रोजी सकाळी ८ ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाहींचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर आलेल्या दिंड्याचे प्रस्थान होणार आहे.
मिठासाठी यात्रा होती प्रसिद्ध
ही (Saint Namdev Yatra) यात्रा मिठाच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. धान्याच्या बदल्यात मीठ हे या यात्रेचे वैशिष्ट्य होते. पापमोचणी एकादशीला सुरू होणारी मिठाची यात्रा पंधरा दिवस चालत होती. यामध्ये राज्यासह अन्य राज्यांतून मीठ विक्रीसाठी आणले जात होते. परिसरातील शेतकरी, गावकरी बैलगाडीने यात्रेला घेऊन धान्याच्या बदल्यात वर्षभर पुरेल एवढे मीठ खरेदी करत होते. त्यातून मोठी उलाढाल होत होती. आता गावोगावी झालेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे बैलगाड्यांनी येणाऱ्यांची संख्या नगण्य झाली. आधुनिकतेत मिठाच्या साठवणुकीची परंपराही लोपली. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून मिठाची उलाढाल होलसेल’वरून किरकोळ’वर आली आहे.
भाविकांसाठी सुविधा
यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल होणार आहेत. त्याशिवाय गुरुवारी रात्री परिसरातील पन्नास गावांतील दिंड्या दाखल होणार आहेत. भाविकांसाठी सोपी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कड़क उन्हाळा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे, अशी माहिती संत नामदेव संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार यांनी सांगितले.