Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आणखी > अध्यात्म

संत नामदेवांचे विचार

भक्ती: संत नामदेवांची

संत नामदेव यांच्या मते, विठ्ठल भक्ती हे सर्वात सोपे आणि खरे धार्मिक मार्ग आहे. त्यांनी भक्तीचे महत्त्व आणि ढोंगीपणाबद्दल चेतावणी दिली.


भक्ती संत नामदेवांची

भगवद्गीतेत ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग, असे परमेश्वराच्या प्राप्तीचे चार मार्ग सांगितले आहेत. भक्तिमार्ग हा एकमेव साधा आणि सरळ सामान्य माणसाला समजणारा मार्ग आहे, असे संत नामदेव सांगतात. जगातल्या सगळ्या पवित्र गोष्टी आणि जिव्हाळ्याची नाती श्रीविठ्ठलाच्या ठिकाणी एकवटली आहे, अशी नामदेवांची श्रद्धा आहे. संत नामदेव म्हणतात-
तीर्थ विठ्ठल। क्षेत्र विठ्ठल।। 
देव विठ्ठल। देवपूजा विठ्ठल।।१।।
माता विठ्ठल। पिता विठ्ठल।। 
बंधु विठ्ठल। गोत्र विठ्ठल।।२।। 
गुरू विठ्ठल। गुरूदेवता विठ्ठल।। 
निधान विठ्ठल। निरंतर विठ्ठल।।३।। 
नामा म्हणे मज। विठ्ठल सापडला।। 
म्हणूनी कळीकाळा। पाड नाही।।४।। 

या अभंगाचा भावार्थ हा की, संत नामदेव म्हणतात श्री विठ्ठल हेच माझे तीर्थक्षेत्र किंवा पवित्र स्थान आहे. त्यामुळे दुसर्‍या क्षेत्राच्या ठिकाणी जावे आणि पावन होऊन यावे, याची मला गरज वाटत नाही. विठ्ठल हाच माझा परमेश्वर आहे. एवढेच नव्हे, तर फुले, तुळशी, गंध, कापूर, असे देवाच्या पूजेचे जे साहित्य असते, तेसुद्धा विठ्ठल रूप आहे. त्या सर्वांमध्ये विठ्ठल भरून राहिला आहे. माझी आई, माझे वडील, माझी भांवडे आणि इतर सारे नातेवाईक यांना मी विठ्ठलाच्याच ठिकाणी पाहतो. श्री विठ्ठल हा माझा गुरूदेव आहे तोच माझे सुखाचे सर्वस्व आहे. विठ्ठल हाच माझ्या आनंदाचा ठेवा आहे. असा हा श्री विठ्ठल मला गवसला आहे. मला त्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे काळ किंवा यमराज यांची मला फिकीर नाही. विठ्ठलाच्या भक्ताला कशाचेही भय नसते, असे सांगून संत नामदेवांनी सामान्य माणसाचे आयुष्य आनंदमय केले, सुखी केले.
मात्र भक्तीचे स्तोम माजविणार्‍या भोंदू आणि लबाड लोकांच्या बाबतीत नामदेवांची वाणी कठोर होती. संत नामदेव म्हणतात, 'टिळे, टोपी, माळा घालून, भोळ्या भाविक लोकांना फसविणार्‍या दांभिक, वेषधारी साधूची संगत टाळावी. असे ढोंगी लोक गोसावीपणाचा वेष घेतात; पण मनात लोभ, मत्सर, अहंकार असतो. अशा लबाड, दांभिक संन्याशाच्या मनात विठ्ठल नामाचा ध्यास नसतो. नामदेव परखडपणे सांगतात, कडू कारले साखरेत घोळले, तरी त्याचे कडूपण जात नाही. तसेच, दुष्ट माणसाने गंगेत स्नान केले, तरी त्याचे मन निर्मळ होत नाही. अंगावर भस्माचे टिळे आणि चंदनाची उटी लावून, गळ्यात तुळशीची माळ घालणार्‍या माणसाने लोभ, स्वार्थ, अहंकार आणि मत्सर सोडला नसेल, तर त्याला खरा भक्त म्हणता येणार नाही.
लटके शब्दज्ञान व्यर्थ असते. सुखाचे खरे कारण अंतरी असते. वेद म्हणणारे लोक वैदिक होतात. पुराण सांगणारी मंडळी पुराणिक होतात. यज्ञ करणारी माणसे याज्ञिक होतात; पण त्यांच्यापैकी कुणीही वैष्णव किंवा विठ्ठलाचा भक्त होत नाहीत, असे परखडपणे संत नामदेव सांगतात. 'गोसावीपणाचा दाखविती वेष। नाही निज ध्यास हरिनामी,' असे असेल तर त्याचा काय उपयोग आहे? 'मन संकल्पाची पापे। न जाती तीर्थाचेनि बापे।।' मनात पापवासना असेल, तर तिथे तीर्थक्षेत्र तरी काय करणार? अशा प्रकारे नामदेवांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून खरा संत आणि ढोंगी यांच्यातील फरक ओळखून लोकांनी फसगत करून घेऊ नये यासाठी हा महत्त्वाचा इशारा दिला आहे. संत नामदेव आवर्जून सांगतात, विठ्ठल भक्तीमुळे सर्व दोष आणि सर्व पापे नष्ट होतात. मन आनंदी होते, चित्त शुद्ध होते. माणसामध्ये देव शोधण्याचा मार्ग म्हणजे भक्ती होय. माणूस संस्कारक्षम होण्याचे सोपे आणि सरळ साधन म्हणजे विठ्ठल भक्ती होय. संत नामदेव सांगतात, विठ्ठल भक्तीमुळे पशूचा माणूस, माणसाचा देव आणि देवाचा संत बनतो.

विजय पिंपळशेंडे,
सेवानिवृत्त प्राचार्य, वरोरा
मो. नं.: ९२२६१८३३६१

Related to this topic: