लोकप्रिय डिझाईन प्लॅटफॉर्म Canva ने आपल्या वापरकर्त्यांसाठी बहुप्रतिक्षित ‘Offline Mode’ फीचर उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे.
ऑटो-सिंक सुविधेसह 14 दिवस ऑफलाइन कामाची मुभा; विद्यार्थी, शिक्षक आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी ठरणार उपयुक्त
(Canva Offline Mode) लोकप्रिय डिझाईन प्लॅटफॉर्म Canva ने आपल्या वापरकर्त्यांसाठी बहुप्रतिक्षित ‘Offline Mode’ फीचर उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे. या नव्या सुविधेमुळे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध नसतानाही युजर्सना डिझाईन तयार करता येणार असून विद्यमान डिझाईन्समध्ये आवश्यक बदलही करता येणार आहेत. विशेष म्हणजे, ऑफलाइन अवस्थेत केलेले सर्व बदल इंटरनेट पुन्हा सुरू झाल्यानंतर आपोआप मुख्य फाईलशी सिंक होणार आहेत.
कंपनीच्या माहितीनुसार, जागतिक स्तरावरील वापरकर्त्यांकडून सर्वाधिक मागणी असलेल्या फीचर्सपैकी हे एक फीचर होते. त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणीमुळे सर्जनशील कामात खंड पडू नये या उद्देशाने ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या Canva Create इव्हेंटमध्ये या फीचरची घोषणा करण्यात आली होती आणि आता त्याचे टप्प्याटप्प्याने रोलआउट सुरू झाले आहे.
या सुविधेचा सर्वाधिक फायदा सतत प्रवास करणारे व्यावसायिक, विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक तसेच कंटेंट क्रिएटर्सना होणार आहे. कमी नेटवर्क असलेल्या भागात किंवा इंटरनेट उपलब्ध नसलेल्या परिस्थितीतही काम सुरू ठेवणे आता शक्य होणार आहे.
Canva ने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, वापरकर्ते ऑफलाइन वापरासाठी आपले डिझाईन आधीच सेव्ह करून ठेवू शकतात. त्यानंतर सपोर्टेड डिव्हाइस आणि फॉरमॅट्सवर इंटरनेटशिवाय डिझाईन एडिट करण्याची सुविधा उपलब्ध राहील. कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू झाल्यानंतर ऑफलाइन केलेले सर्व बदल स्वयंचलितपणे अपडेट केले जातील.
महत्त्वाची बाब म्हणजे हे फीचर सर्व Canva वापरकर्त्यांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता उपलब्ध करून देण्यात आले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ऑफलाइन सपोर्ट सक्रिय केल्यानंतर वापरकर्ते सलग 14 दिवस इंटरनेटशिवाय डिझाईन तयार आणि संपादित करू शकतात.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी इंटरनेट उपलब्ध असतानाच संबंधित डिझाईनवर ‘Make Offline Available on Design’ हा पर्याय निवडणे आवश्यक आहे. त्यानंतर कनेक्टिव्हिटी खंडित झाली तरी काम सुरू ठेवता येईल.