Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आणखी > अध्यात्म

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।भेदाभेदभ्रम अमंगळ।।


विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।भेदाभेदभ्रम अमंगळ।।

भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा आहे. भक्तीमधला भाव हा सर्वांच्या कल्याणाचा असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. सर्वांच्या कल्याणाचा असलेला भाव हा खर्‍या अर्थाने परमेश्वराला प्रिय असतो आणि असा भाव बाळगणारा भक्त हाच खरा ईश्वराचा भक्त असतो; असे म्हणता येईल. अनेकदा भक्ती करताना, अनेक लोक भेदयुक्त भक्ती करतात. भक्तीमधला हा भेद घरामधून मंदिरापर्यंतचा प्रवास करताना प्रामुख्याने दिसून येतो. मंदिरात कोणासोबत जायचे? मंदिरात केव्हा जायचे? मंदिरात गेल्यानंतर कोणाशी बोलायचे? आपल्या प्रतिष्ठेचा आणि पैशाचा उपयोग करून अगोदर दर्शनाचा लाभ कसा घ्यायचा? असे अनेक प्रश्न मनामध्ये ठेवून बर्‍याचदा बरेच जण भक्ती मार्गाला जाताना दिसतात. देवाला शुद्ध मनातील भाव अपेक्षित आहे; याची जाणीव जणूकाही आपल्याला नसते, असे वाटते. हा सर्व भेद करत असताना आपण सर्वजण विसरतो की, हे जग विष्णुमय आहे. विष्णुमय अर्थात एकच तत्त्व सर्वत्र भरून राहिले आहे. अशा या एक तत्त्वामध्ये एक भक्त म्हणून आपण सर्वांनी एकरूप होणे यालाच वैष्णवांचा धर्म असे म्हणता येईल. माणसा-माणसामध्ये भेद करणारा माणूस या अभंगातील तत्त्वानुसार वैष्णव कसा होईल? गरिबी-श्रीमंती, जात-धर्म, पैसा-प्रतिष्ठा या आणि यांसारख्या माणसांमध्ये भेद करणार्‍या गोष्टी जर भक्तांमध्ये आणि भक्तींमध्ये आड येत असतील तर, त्याला भक्ती म्हणता येणार नाही. त्याला केवळ भक्तीचे प्रदर्शन म्हणता येईल. जगामध्ये एकच तत्त्व सर्वत्र भरून राहिले आहे, असे मानणे, हा वैष्णवांचा धर्म आहे. यामध्ये भेद करणे, विषमता बाळगणे आणि कोणत्याही कारणाने भेद निर्माण करणे, हे अतिशय वाईट आहे. भक्तीमधल्या भेदाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी अमंगळ म्हणजे वाईट असल्याचे अभंगाच्या पुढील चरणामध्ये सांगितले आहे...
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। 
भेदाभेदभ्रम अमंगळ।।१।।

 तुम्ही जर भगवंताचे भक्त असाल, तर ऐका की, कोणत्याही जीवाचा भेद करू नका. तुम्ही जे काही कराल, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वांचे हित असले पाहिजे. थोडक्यात, सर्वांच्या हितासाठी तुमची भक्ती असली पाहिजे. सर्वांच्या हितामध्ये आपलेही हित असते; हे भक्ती करणार्‍या प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. भक्ती हा प्रदर्शनाचा भाग नसून त्यामधून प्रत्येक भक्ताने मानवतेचे आणि माणुसकीचे दर्शन घडवणे अपेक्षित आहे. मानवाचे भेदरहित वर्तन म्हणजे मानव धर्म. हा मानव धर्म जोपासण्याची गरज आहे. म्हणून, जगद्गुरू संत तुकाराम महाराज भगवंताच्या भक्ताला, भक्तीमधले हित आणि सत्य अभंगाच्या दुसर्‍या चरणामध्ये सांगतात...
 अइका जी तुम्ही भक्त भागवत।
 कराल तें हित सत्य करा।।२।।

 हे संपूर्ण जग विष्णुमय आहे आणि या जगामधला प्रत्येक जीव हा विष्णूचा एक अंश आहे. असं एक तत्त्व सांगणारा हा अभंग. या अभंगामधून खरी भक्ती सांगताना, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी खरा भक्तही सांगितला आहे. खरा भक्त सांगितला म्हणजे भक्त खोटाही असतो का? असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो? तर आपल्या मनातील प्रश्नाचे उत्तर आपण आपल्या मनालाच विचारू! पण तत्पूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी वैष्णवांचा धर्म सांगताना कोणत्याही जीवाचा मत्सर घडायला नको; असे सांगितले आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रारंभिक अवस्थेमध्ये भक्ती म्हणजे मंदिरात जाऊन केलेली देवाची पूजा असे म्हणता येईल. मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिरामध्ये पूजेसाठी आलेल्या लोकांमध्ये एकमेकांविषयी असलेला द्वेष आणि मत्सर, श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी भावना जर आपण बघितली तर, खरा भक्त आणि खोटा भक्त याचा अर्थ आपल्या लक्षात येईल. कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये, कारण प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे. त्या प्रत्येकामध्ये परमेश्वर शोधणे किंवा ओळखणे यातच परमेश्वराच्या पूजनाचे वर्म दडलेले असल्याचे जगद्गुरू संत तुकाराम महाराज अभंगाच्या पुढील चरणामध्ये सांगतात...
कोणाही जीवाचा न घडो मत्सर।
 वर्म सर्वेश्वर पूजनाचें।।३।।

 आपल्या हातून जर, कोणत्याही जीवाचा मत्सर घडला, तर ती गोष्ट आपल्या भक्तीमध्ये अडथळा ठरू शकते. त्यामुळे आपल्याला आपल्या भक्तीचे फळ मिळत नाही. थोडक्यात, आपण ईश्वर कृपेस पात्र होत नाही. 
 मानवाच्या मनामधील भेद ज्या वेळेला नष्ट होईल, त्यावेळेला तो ईश्वराच्या कृपेस पात्र ठरेल, कारण देहाच्या प्रत्येक अवयवाला जसे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे समाजामधला प्रत्येक घटक, या भूतलावरील प्रत्येक घटक हा तेवढाच महत्त्वाचा आहे. एकाला सुख प्राप्त झाले तर, त्याचा आनंद सर्वांना झाला पाहिजे आणि जर कुणाला दुःख झाले असेल तर, त्याचे सर्वांना दुःख वाटले पाहिजे, असा भाव ज्या वेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये येईल, त्या वेळेला प्रत्येकजण ईश्वर पात्र ठरेल, असे म्हणता येईल. भागवत धर्माची समत्वाच्या दृष्टीने फार मोठी कामगिरी सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. भेददृष्टीने पाहणे संतांनी अमंगल मानले आहे. आपण सर्वांनी आपल्या वृत्तीमधील अमंगलपणा काढून आपले जीवन मंगल बनवण्याचा उपदेश जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये केला आहे...
तुका म्हणे एका देहाचे अवयव।
 सुख दुःख जीव भोग पावे।।४।।

समाजामधील भेदाभेद हा जर पन्नास टक्के जरी नाहीसा झाला, तरी हा संसार स्वर्गमय होईल. 

भगवान राईतकर
मो.९७३०३३२१५१
gramgeeta1977@gmail.com

Related to this topic: