राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संपूर्ण जीवन तत्त्वज्ञान त्यांच्या ग्रामगीता ग्रंथात संग्रहित आहे. त्यांनी जीवनभर केलेल्या प्रवासातील निरीक्षण, अनुभव ग्रामगीतेत शद्बबद्ध केले आहेत. स्वानुभवाप्रमाणे आधुनिक विज्ञान- तंत्रज्ञानाच्या जगाबरोबर असण्यासाठीचे उपक्रम, आराखडे, योजना, उपायसुद्धा ग्रामगीतेत ओवीबद्ध केले आहेत. देशाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून योजना या 'ग्रामगीता' ग्रंथात सांगितल्या आहेत. राष्ट्रसंतांची ग्रामगीता म्हणजे काल, आज आणि उद्या म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तिन्ही काळांचा विचार दर्शविणारा कालदर्शी ग्रंथ होय. ग्रामगीतेची निर्मिती हेतूपूर्वक, सप्रयोजन आहे. राष्ट्रसंत तुकडोजींनी स्वतःच ग्रामगीतेला 'ग्रामगीता माझे हृदय। त्यात बसले सतगुरूराय। बोध त्यांचा प्रकाशमय। दिपवोनि सोडिल ग्रामासि।।' म्हटलेले आहे.
राष्ट्रसंतांनीच ग्रामगीतेमध्ये ग्रामगीतेचे प्रयोजन ओवीबद्ध केले आहे. ग्रामगीतेच्या प्रयोजनानुसार पुढील मुद्दे जाणवतात.
मानवी वर्तन सुधारण्याकरिता: इतिहासाचे परिशीलन केल्यास असे दिसून येते, की आजपर्यंत रूढी, परंपरा, जीवनमूल्य, शिक्षण, सद्ग्रंथ, समाज, कुटुंब, संत, समाजसुधारक यांनी माणसाचे वर्तन, आचरण, सुधारण्याकरिता प्रयत्न केल्याचे आढळून येतात. ग्रामगीता निर्मितीचाही हाच सद्हेतू असल्याचे सांगताना राष्ट्रसंत म्हणतात-
'प्रथम पाया मानव वर्तन। यास करावे उत्तम जतन।
गाव करावे सर्वांगपूर्ण। आदर्श चित्र विश्वाचे।
यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ। आचरण ज्ञान मूळारंभ
सक्रियेतचा मूळ स्तंभ। उभारावा।।'
विश्वाकार वृत्ती होण्यासाठी: गाव हे विश्वाचे आदर्श चित्र आहे. विश्व आणि ब्रह्मांड यांची सुरुवात आपल्यापासूनच होते. ग्रामगीतेमध्ये एका मुख्य विचारातून दुसरा तितकाचा मुख्य विचार प्रसव पावतो. 'प्रथम पाया मानव वर्तन। यास करावे उत्तम जतन' हे सांगताना 'गाव करावे सर्वांगपूर्ण। आदर्श चित्र विश्वाचे' अशा प्रकारची मानवी वर्तनाची विश्वाशी सांगड घालायला राष्ट्रसंत विसरत नाहीत. एकाच मागणीमध्ये अनेक वर मागण्याचे कसब किंवा कौशल्य या ओवीतून राष्ट्रसंतांनी दाखविलेले आहे. गाव सर्वांगपूर्ण करण्यासाठीही या ग्रंथाचे प्रयोजन आणि विश्वकल्याण साध्य करण्यासाठी या ग्रामगीता ग्रंथाचे प्रयोजन आहे. या संदर्भात राष्ट्रसंत म्हणतात-
'आपणासी देवापायी समर्पावे। विश्वी विश्वाकार व्हावे।
पहावे तैसे बोधीत जावे। जीवालागी।।
ऐसे धरोनी मानसी। आरंभ केला ग्रामगीतेसी।
प्रार्थुनिया संतमहंतासी। आशीर्वाद घेतला।'
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या माध्यमातून आवर्जून सांगतात-
देवापाशी समर्पण म्हणजे विश्वाकार वृत्ती होणे, समाजाच्या, गावाच्या उपयोगी पडणे, शेजार्याच्या, समाजाच्या, गावाच्या सुख-दुःखात सहभागी होणे.
'विश्वब्रह्म बोलत गेला। सभोवती समाज दुःखी बुडाला
ग्रामसेवाही न कळे ज्याला। त्याचे ज्ञान व्यर्थचि।'
ग्रामगीतेची निर्मिती विश्वाकार वृत्ती स्फुरण्यात झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वाकार दृष्टांताचा अद्भूूत उल्लेख करताना म्हणतात-
'तेथे दृष्टांत होई अद्भूूत। कासया करावी विश्वाची मात।
प्रथम ग्रामगीताचि हातात। घ्यावी म्हणे।।'
समाज रचना बदलण्यासाठी:
अंधश्रद्धा, अज्ञान, अस्वच्छता, कर्मकांड, अनिष्ट रूढी, परंपरा, भेदभाव, दारिद्र्य, दैन्य, आळस इत्यादी विकृतींपासून मानवी वर्तन मुक्त करावयाचे असेल, तर आमूलाग्र क्रांतीची गरज आहे.
उपदेश सुधारी काही लोकां।
परि समाजरचना देई धोका।
तेणे आणता नये का।प्रत्यक्षात शद्बबोध।
म्हणोनि समाजरचना बदलावी।
संत बोधावरी मांडणी करावी।
ब्रह्मज्ञानासि सक्रियता द्यावी।समत्व आणूनि जीवनी।
समानतेची समाजरचना।शांति देई जीवजना।
साधनात साधन समाजरचना।समाजरचना, गावरचना।
विवाहदि संस्कार राज्यायोजना।
गांव सर्वांगपूर्ण करण्यासाठी: राष्ट्रसंत ग्रामगीतेच्या माध्यमातून म्हणतात-
'विश्व ओळखावे आपणावरून। आपणची विश्वघटक जाण।।
व्यक्तिपासूनी कुटुंब निर्माण। कुटुंबापुढे समाज आपुला।।
समाजापुढे ग्राम आहे। ग्रामापुढे देश राहे।।
देश मिळोनी ब्रह्मांड होय। गतीगतीने जवळ ते।।
मानवमात्राचे प्रथम माहेर। आपुले गाव त्यातील घर।।
यातूनि प्रगती करीत सुंदर। पुढे जावे विश्वाच्या।।'
आपणावरून विश्व ओळखावे. आपणच या विश्वाचा घटक आहे हे जाणले पाहिजे. विश्वाचा घटक व्यक्ती असल्यामुळे व्यक्ती व्यक्ती मिळून कुटुंब निर्माण होते. कुटुंब कुटुंब मिळून समाज निर्माण होतो. समाजापुढे ग्राम आहे, गाव आहे. ग्रामापुढे देश आहे आणि अनेक देश मिळून ब्रह्मांड तयार होते. म्हणून विश्वाचा प्रत्येक घटक म्हणजे प्रत्येक माणूस आदर्श करीत सुंदर ग्रामराज्य निर्माण करण्याचा ध्यास हे ग्रामगीतेचे प्रयोजन आहे, उद्दिष्ट आहे. राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेत 'ग्रामकुटुंब योजना, ग्रामशुद्धी, ग्राम निर्माण कला, ग्राम आरोग्य, भू-वैकुंठ' यासारखे ग्रामसुधारणेचे नवीन प्रयोग सांगितले आहेत. ग्रामगीतेतील 'भू-वैकुंठ' या ३९ व्या अध्यायाच्या माध्यमातून राष्ट्रसंतांनी आदर्श खेड्याची संकल्पना वर्णन केली आहे. हे उदात्त असून अशा प्रकारची खेडी भारतात निर्माण झाली तर राष्ट्रीय पुनरूत्थान सहजरित्या घडून येईल. या संदर्भात राष्ट्रसंत म्हणतात-
'गावाची करावी आदर्श व्यवस्था।
म्हणोनि कथिली ग्रामगिता।
ग्रामा पासोनि पुढे वाढवा। विश्वव्यापी व्हाया।
जााणवे ग्राम हेचि मंदिर। ग्रामातील जन सर्वेश्वर।
सेवा हेची पूजा समग्र। हाचि विचार निवेदावा।।
ईश्वर व्यापिले हे विश्व। म्हणोनि जगचि आम्हा देव
विश्वाचा मूळ घटक गाव। ग्रामगीता त्यासाठी।
याप्रमाणे गावामध्ये ईश्वरी राज्य निर्माण करण्यासाठी ईश्वरी संकल्प म्हणजेच ग्रामगीतेचे प्रयोजन आहे. 'ग्रामगीता' या शब्दातच गावाची रचना, गावाची व्यवस्था, गावनिर्मिती, गावसुधारणा, ग्रामशुध्दी, ग्रामआरोग्य, त्या संबंधित ज्या ज्या गोष्टी येतील त्या सर्वांचे विवेचन राष्ट्रसंत तुकडोजींनी केले आहे. आजच्या परिस्थितीत शासनाने अंमलात आणलेल्या योजना-ग्रामस्वच्छता अभियान, सहकारी बचत गट, गोदरी मुक्तगाव या योजना ग्रामगीतेतील विचारांचा गाभा आहे.
ग्रामगीतेची फलश्रुती: राष्ट्रसंतांनी ग्रामगीता वाचनाची फलश्रुती 'ग्रंथ महिमा' या ४१ व्या अध्यायात दिली आहे. विश्वसुधारणेचा पाया मानवी वर्तन होय, हे जाणून हे मानवी वर्तन जतन करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजींनी ग्रामगीतेचे प्रयोजन सांगितले आहे. माणसातील वाईट प्रवृत्ती नष्ट व्हाव्यात आणि त्याच्या ठिकाणी चांगल्या गुणांचे जतन व्हावे याकरिताच या ग्रामगीता ग्रंथाचे प्रयोजन आहे. या संदर्भात राष्ट्रसंत म्हणतात-
ग्रामगीता नव्हे पारायणासि। वाचता वाट दावी जनांसि।
समूळ बदलवी जीवनासि। मनी घेता अर्थ तिचा ।।६६।।
ही नव्हे फुले टाकण्यासाठी। ही ग्रामाची उद्धार दृष्टि।
आजच्या युगाची संजीवनी बुटी। मानतो आम्ही ग्रामगीता।।६७।।
विजय पिंपळशेंडे,
सेवानिवृत्त प्राचार्य, वरोरा
मो. नं.: ९२२६१८३३६१