भगवद्गीतेला गीतोपानिषदही म्हटले आहे. सर्व उपनिषदाचे सार असलेले गीतोपनिषद किंवा भगवद्गीता ही एका गायीप्रमाणे आहे आणि गोरक्षक म्हणून, आदि विष्णू म्हणून भगवान श्रीकृष्ण तिचे दूध काढत आहे. त्या काळात अर्जुनरूपी वासराने त्याचे प्राशन केले व जीवनाचे कल्याण करून घेतले तर वर्तमान काळात सुध्दा एका दिव्य साहित्य ग्रंथाच्या माध्यमातून भगवद्गीता आपल्याला मिळालेली कामधेनू गायीप्रमाणे दिव्य देणगी आहे. तिच्या अमृततूल्य दुधाचे अठरा अध्याय सारांश रूपाने प्राशन करून पहिल्या अध्यायात कुरूक्षेत्रातील युध्दस्थळाचे वर्णन असून दोन्ही पक्ष युध्दासाठी सज्ज असतांना जवळचे नातेवाईक गुरू, मित्र समोरासमोर एकमेकांचे जीव घ्यायला अन् द्यायला उभे ठाकले असतांना शोकाकूल मोहग्रस्त खचलेल्या अर्जुनाचे मन गोंधळून युध्द सोडून जाण्याचे ठरवते. खचलेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण दुसर्या अध्यायात सांख्य योगाच्या माध्यमातून नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यांच्यातील मुलभूत अंतर स्पष्ट करून परमेश्वराची सेवा, पुरुषाची लक्षणे याविषयी आदेश करतात. उपदेशातील प्रथम योग म्हणजे कर्मयोगाचे महत्त्व. भगवान श्रीकृष्ण तिसर्या अध्यायातून सांगतात की, या भौतिक जगामध्ये परमेश्वराला स्मरून प्रत्येकाला कोणते ना कोणते कार्य करावे लागते परंतु या कर्माच्या माध्यमातून संसारात गुंतून न राहता निष्काम भावनेने कर्म केल्यास मनुष्य कर्माच्या फेर्यातून मुक्त होऊ शकतो व आत्मा-परमात्मा याबद्दल दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. म्हणून ज्ञानकर्म संन्यास योग अर्थात दिव्यज्ञानाचे महत्त्व भगवान श्रीकृष्ण चौथ्या अध्यायात सांगताना म्हणतात की, आत्मा, परमेश्वर आणि त्याच्या परस्पर संबंधाविषयीचे ज्ञान हे शुध्द करणारे व मुक्ती देणारे असते. हे ज्ञान निष्काम भक्ती व कर्मयोगाचे फळ असते. कर्मयोगाचे फळ समजून सांगताना, भगवान श्रीकृष्ण पाचव्या अध्यायात बुध्दीवान मनुष्याचे लक्षण सांगतांना म्हणतात की बुध्दीवान मनुष्य दिव्य ज्ञानरूपी अग्नीत शुध्द होऊन कर्म करतांना फळाचा त्याग करून केवळ निष्काम कर्म करतो व त्यातून आनंद निर्मिती प्राप्त करून घेतो.
भगवान श्रीकृष्ण गीतेच्या सहाव्या अध्यायात ध्यान योगाच्या रूपाने आनंदी मनुष्य मन आणि इंद्रिय नियंत्रीत करून परमात्म्यावर ध्यान केंद्रीत करतो व त्यातून आत्मसाक्षात्कार करून घेतो. गीतेच्या सातव्या अध्यायात ज्ञानयोगाच्या माध्यमातून भगवद्ज्ञान समजून सांगितले. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की परमेश्वर परम सत्य आहे. ज्ञानी लोकांनी परमेश्वराला शरण जावे व त्यातून आपले हित साधावे. परमेश्वरास शरण जाऊन भगवद्प्राप्तीचे महत्त्व सांगताना आठव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, परमेश्वराचे परमधाम हे भौतिक जगाच्या पलीकडचे आहे. हे परम गोपनीय ज्ञान श्रीकृष्णांनी नवव्या अध्यायात समजून सांगताना म्हटले की, भक्तीच्या माध्यमाद्वारे जीवात्म्याचा त्याच्याबरोबर शाश्वत संबंध असतो. शुध्द भक्ती जागृत केल्याने मनुष्य वैकुंठ लोकातील परमधाम प्राप्त करू शकतो. दहाव्या अध्यायामध्ये भगवंताचे ऐश्वर्य सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, संपूर्ण जगतामध्ये भगवंताचे बळ, सौंदर्य, शक्ती, वैभव जाणून घेण्यासाठी त्याचे अवतार कार्य असते. यातून परमेश्वराच्या ऐश्वर्याची जाणीव होते. या अवतारकार्य किंवा विश्वरूपाचे दर्शन अकराव्या अध्यायातून सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की परमेश्वराचे सर्वांगसुंदर मानवसदृश्य शरीर हेच परमेश्वराचे मुळ रूप आहे. केवळ शुध्द भक्तीद्वारेच मनुष्य हे रूप पाहू शकतो. या भक्तीयोगाचे महत्त्व सांगताना बाराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की परमेश्वराची (श्रीकृष्णाची) प्रेममयी सेवा करण्यासाठी भक्तीयोग ह सर्वात सुलभ व श्रेष्ठ साधन आहे. प्रकृती, पुरूष आणि चेतना यांचे महत्त्व तेराव्या अध्यायातून भगवान श्रीकृष्ण सांगतात की ज्या मनुष्याला शरीर, आत्मा आणि दोघांच्याही पलीकडे स्थित असलेला परमात्मा यांच्यातील फरक समजतो तो या भौतिक जगातून मुक्त होतो.
भगवान श्रीकृष्ण गीतेच्या चौदाव्या अध्यायातून त्रिगुणरूपी माया या संदर्भातील उपदेश करतांना म्हणतात, की सर्व देहधारी जीव सत्व, रज, आणि तम या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या नियंत्रणाखाली असतात. यातून मुक्तावस्था कशी प्राप्त करायची याची लक्षणे सांगितली आहे. पंधराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की श्रीकृष्ण हे पुरूर्षोत्तम भगवान आहेत. ज्याला हे स्वरूप समजते तो निष्ठावान भक्त असतो. व तो परमेश्वरास प्रिय असतो. देवी आणि आसुरी स्वभाव गुणासंदर्भात उपदेश करतांना भगवान श्रीकृष्ण सोळाव्या अध्यायात म्हणतात. की जे धर्म व शास्त्राचे पालन करून दैवी गुणांचे आचरण करतात. ते अध्यात्मिक पूर्णत: प्राप्त करतात. व जे अधर्माचे पालन करून असुरी गुणांचा अवलंब करतात. ते नीच योनीत जन्म घेवून स्वत:चा नाश करून घेतात. भगवदगीतेच्या अध्याय सतराव्या मध्ये भगवान श्रीकृष्ण श्रध्देचे तीन प्रकार जसे की, सत्व, रज व तम या विषयी उपदेश करतांना म्हणतात. की, रजोगुणी व तमोगुणी श्रध्दा बाळगणार्या व्यक्तींना क्षणभंगूर भौतिक फळाची प्राप्ती होते तर सत्वगुणी धर्माचरण करून हृदयाचे शुध्दीकरण करतात. परमेश्वराच्या ठायी श्रध्दा व भक्ती अर्पण करतात. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या अठराव्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योगाचा उपदेश करतांना गीतेचा निष्कर्ष व त्यागाची पूर्णत: सांगताना श्रीकृष्णांना पूर्णपणे बिनशर्त व भक्तीभावाने शरण जाणे अन् ही शरणागतीच आपणास सर्व पापातून मुक्त करून पूर्ण ज्ञान प्राप्त करून देते. व त्यातून जीवन जगण्याचे सार्थक होते. वर्तमान युगामध्ये मनुष्यप्राणी भौतिक कार्यामध्ये इतका मग्न आहे की, त्याला संपूर्ण वैदीक साहित्याचे वाचन शक्य नाही. आणि याची फारशी गरजही नाही. त्यासाठी 'भगवद्गीता' हा एकच ग्रंथ पुरेसा आहे. कारण गीता ही संपूर्ण वैदीक ज्ञान व उपनिषिदांचा सार आहे. गीतेचे महत्त्व सांगताना पुढील संस्कृत ओव्या अशा की,
'मलिने मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने ।'
सकृत गीता मृत
स्नानं संसार मलनाशनम्।।
अर्थात प्रतिदिन मनुष्य पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असेल, परंतु जर एखाद्याने एकदा सुध्दा पवित्र जलरूपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले तर त्याची भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट होते. अशाप्रकारे भगवद्गीतेचे सारांशरूपाने थोडक्यात दर्शन आपण बघितले.
अशाप्रकारे सर्वांगसुंदर जगण्यास बळ देणारी भगवद्गीता केवळ एक धर्मग्रंथ नसून नितीमुल्याचे शिकवण देणारे हे साहित्य एक दिव्य ग्रंथ म्हणून मानव कल्याणासाठी परमेश्वराची रचना आहे.
विनोद शेनफड जाधव
मु.पो.मसरूळ ता.जि.बुलढाणा
मो.नं.९७६३२८२०७७